५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ठाणे, महाराष्ट्र येथील कु. मिष्का शशांक चौबळ (वय ८ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. मिष्का शशांक चौबळ ही या पिढीतील एक आहे !

सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

‘चैत्र शुक्ल पक्ष नवमी (श्रीरामनवमी), म्हणजे १०.४.२०२२ या दिवशी ठाणे, महाराष्ट्र येथील कु. मिष्का शशांक चौबळ हिचा आठवा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आजीला (वडिलांच्या आईला) जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

कु. मिष्का चौबळ

कु. मिष्का शशांक चौबळ हिला आठव्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद ! 

(मिष्काचा अर्थ मिष्कील असा आहे)

१. जन्म ते ११ मास

१ अ. आनंदी स्वभाव : ‘बालिकेचा जन्म चैत्र मासात रामनवमीच्या दिवशी झाला. तिचे नाव ‘मिष्का’ (‘मिष्का’चा अर्थ मिष्कील असा आहे.) असे ठेवण्यात आले. ती सतत आनंदी असायची.

१ आ. श्रीकृष्णार्जुनाच्या चित्राकडे पाहून हुंकार देणे : तिला पाळण्यात ठेवल्यावर ती श्रीकृष्णार्जुनाच्या चित्राकडे पाहून हुंकार द्यायची आणि हात-पाय जोरजोरात हालवून श्रीकृष्णाशी संवाद साधायची. ती मध्येच थांबून जणूकाही ‘देव काहीतरी बोलत आहे’, ते लक्षपूर्वक ऐकायची आणि मोठ्याने हुंकार द्यायची.

२. वय – १ ते २ वर्षे

सौ. मीना चौबळ

२ अ. उत्तम स्मरणशक्ती : मिष्काला श्लोक, स्तोत्रे, तसेच देवता आणि इतर विषय यांची माहिती लवकर पाठ होत असे. तिला स्तोत्रे म्हणतांना आणि जयघोष करतांना पुष्कळ आनंद व्हायचा.

३. वय – ३ ते ५ वर्षे

३ अ. मिळून मिसळून रहाणे : मिष्का बालवाडीच्या वर्गातील मुलांशी आणि शेजारच्या मुलांशी मिळून मिसळून खेळत असे. तिचे कुणाविषयीही गाऱ्हाणे नसायचे. ती नेहमी हसतमुख असते.

३ आ. प्रेमभाव : एखादे लहान मूल रडत असेल, तर ती प्रेमाने त्याचे डोळे पुसून त्याला समजावत असे आणि आपले खेळणे त्याला देत असे.

३ इ. नेतृत्व गुण : शाळेतील मुलांमध्ये किंवा कुठेही भांडण किंवा वाद होत असेल, तर ती तो वाद सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असे.

३ ई. मिष्काला शाळेत ‘सर्वाेत्तम विद्यार्थिनी’ हे पारितोषिक मिळणे : शाळेतील कुठल्याही उपक्रमात ती भाग घेत असे आणि त्यात तिचा अग्रक्रम असे. त्यामुळे ती सर्वांचीच लाडकी होती. तिला शाळेत ‘सर्वाेत्तम विद्यार्थिनी’ हे पारितोषिक मिळाले होते.

३ ई. सूक्ष्मातील कळण्याची क्षमता : मिष्का एकदा तिच्या वडिलांकडे पहात कौतुकाने हसून म्हणाली, ‘‘ते बघा स्वामी महाराज ! तुमच्याकडे बघून ते हसत आहेत.’’ कधी कधी ती वडिलांना बाजूला व्हायला सांगते आणि म्हणते, ‘‘स्वामी महाराज येत आहेत, त्यांना वाट करून द्या. त्यांना धक्का लागेल.’’ कधी ती शून्यात पाहून खुदूखुदू हसते आणि विचारल्यावर सांगते, ‘‘मी स्वामींकडे पाहून हसते आहे. ते मला किती हसवतात !’’

३ उ. देवाप्रती भाव

३ उ १. मुलांना प्रार्थना करण्यास सांगणे : मिष्का ४ वर्षांची असतांना वसाहतीमधील मुलांच्या समवेत खेळत होती. तेव्हा अकस्मात् पावसाचे थेंब येऊ लागले. सर्व मुले ‘आपला खेळ थांबवावा लागेल’; म्हणून हिरमुसली. तेव्हा मिष्काने सर्वांना सांगितले, ‘‘तुम्ही देवाला मनापासून प्रार्थना केली, तर देव तुमचे निश्चितच ऐकेल. आपण प्रार्थना करूया.’’ तिने प्रार्थना केल्यावर खरोखरंच पाऊस थांबला आणि काळे ढग पुढे निघून गेले. तेव्हापासून सर्व मुलांना प्रत्येक गोष्टीसाठी प्रार्थना करण्याची सवय लागली.

३ उ २. मिष्काने मुलांना देवाविषयीची सूत्रे सांगणे आणि मुलांनी गोलाकार बसून तिचे बोलणे आवडीने ऐकणे : खेळून झाल्यावर मुले दमून एकत्र बसतात. तेव्हा मिष्का त्यांना देवाविषयी काही सांगत असे, उदा.‘‘देवाची इच्छा असेल, तरच एखादी गोष्ट आपल्याला मिळते. देवाला प्रार्थना केल्यावर देव आपले ऐकतो. खोटे बोलल्यावर देव शिक्षा देतो. घरच्यांचे ऐकले नाही, तर शिक्षा होते.’’ अशा प्रकारे ती सर्व मुलांना सांगायची आणि मुलेही गोलाकार बसून आवडीने तिचे बोलणे ऐकायची.

३ उ ३. आजीने म्हटलेला श्लोक लक्षपूर्वक ऐकून आजीचे कौतुक करणे : मी आश्रमात असतांना एकदा तिला भ्रमणभाषवर ‘कृष्णाय वासुदेवाय..।’ हा श्लोक म्हणून दाखवला. तेव्हा ती म्हणाली, ‘‘आजी, देवबाप्पा आपल्यावर प्रेम करतो, तसे तुझेही बाप्पावर प्रेम आहे; म्हणून तू असे छान (भावपूर्ण) म्हणतेस.’’

३ उ ४. ‘पिगी बँके’ला (पैसे जमवण्याच्या डब्याला) ‘श्री लक्ष्मीदेवी’ आणि पुस्तकांना ‘श्री सरस्वतीदेवी’ मानून नमस्कार करणे : मिष्का तिचा पैसे जमवण्याचा डबा (पिगी बँक) हा नुसता डबा नसून ‘ती श्री लक्ष्मीदेवी’ आहे’, असे सांगत असे आणि सर्वांना त्या डब्याला नमस्कार करायला लावत असे. ‘पुस्तके म्हणजे श्री सरस्वतीदेवीचे रूप आहे’, हे कळल्यापासून वर्तमानपत्रे किंवा कुठल्याही कागदाला पाय लागल्यावर ती हात लावून नमस्कार करते.

४. वय – ६ ते ८ वर्षे

४ अ. वडिलांना नामजप करायला सांगणे : एकदा मिष्काचे वडील दूरचित्रवाणीवर चित्रपट पहात होते. तेव्हा ती वडिलांना म्हणाली, ‘‘दूरचित्रवाणी पहाण्यापेक्षा नामजप करा. नाहीतर नंतर रडू येईल.’’ तिचे बोलणे ऐकून माझा मुलगा थक्कच झाला. मी मुलाला भ्रमणभाष करून हेच सांगायचे; पण त्याने कधी गांभीर्याने घेतले नव्हते. त्याच्या मुलीचे हे शब्द ऐकून खरोखरंच त्याने नामजप करणे वाढवले आहे.

५. मिष्काचे स्वभावदोष : भित्रेपणा आणि भावनाशील असणे.

‘श्री गुरुकृपेने मिष्कासारखी गुणी नात मला मिळाली’, यासाठी श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता ! ‘परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या कृपेने मिष्काची आध्यात्मिक उन्नती शीघ्र गतीने होऊ दे’, हीच प्रार्थना !’

– सौ. मीना सुनील चौबळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.११.२०२१)

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.