गाण्याची आवड असणाऱ्यांनी आपापल्या क्षमतेनुसार सुगम संगीत किंवा शास्त्रीय संगीत शिकावे आणि त्यातील आनंद घेऊन जीवन समृद्ध करावे !

डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय संगीताचे गायक पू. किरण फाटक (वय ६६ वर्षे) यांनी संगीत साधनेविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

पू. किरण फाटक हे डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय संगीताचे गायक आहेत. त्यांचे वडील श्री. भास्करराव फाटक हे घरी संगीताच्या शिकवण्या घेत होते. त्यामुळे पू. किरण फाटक संगीताच्या वातावरणातच लहानाचे मोठे झाले. पुढे त्यांनी बांद्रा (मुंबई) येथील स्व. इंदिराबाई केळकर आणि त्यानंतर पुणे येथील श्री. विकास कशाळकर यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले.

पू. किरण फाटक
कु. तेजल पात्रीकर

पू. किरण फाटक हे ‘संगीत अलंकार’ असून गेल्या ३० वर्षांपासून डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथे ‘भारतीय संगीत विद्यालया’च्या माध्यमातून मुलांना शास्त्रीय संगीताचे शिक्षण देत आहेत. गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षांसाठी, तसेच अन्य संगीत कार्यक्रमांना त्यांना परीक्षक म्हणून बोलावले जाते. ते श्री स्वामी समर्थ यांचे निस्सीम भक्त आहेत. त्यांना स्वामी समर्थांवर विविध काव्ये आणि भक्तीपर कवने स्फुरली आहेत. आतापर्यंत त्यांचे ४ काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांनी ‘संगीत’ या विषयावर विविध ग्रंथांचे लिखाणही केले आहे. ६.१.२०२० या दिवशी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पू. किरण फाटक यांनी संतपद (७१ टक्के आध्यात्मिक पातळी) गाठल्याचे घोषित केले.

‘संगीत क्षेत्रातील नवोदित विद्यार्थ्यांनी संगीताकडे साधना (उपासना) म्हणून कशा प्रकारे पहावे ?’, याविषयीचे मौलिक मार्गदर्शन पू. किरण फाटक यांनी काही लेखांमधून केले आहे. त्यांच्या या लेखांमधून संगीताकडे पहाण्याचा एक वेगळा दृष्टीकोन संगीत क्षेत्रातील कलाकारांना मिळू शकेल.

– सुश्री (कुमारी) तेजल पात्रीकर (संगीत विशारद, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३१.३.२०२२)

१. नक्कल करणाऱ्याकडे स्वरज्ञान आणि तालज्ञान हे गुण अंगीभूत असतील, तर तो सुगम संगीत किंवा सिनेसंगीत चांगले गाऊ शकणे

‘ज्याला आपण कलाकार म्हणतो, त्या माणसात ‘नक्कल करणे (imitation) अथवा सृजनशीलता (creativity)’, यांपैकी एक गुण नक्कीच असतो. नक्कल करणाऱ्याकडे स्मरणशक्ती असावी लागते, तर सृजनशील कलावंताकडे रचनाशास्त्राचे ज्ञान असावे लागते. नक्कल करणाऱ्याकडे जर स्वरज्ञान आणि तालज्ञान हे गुण अंगीभूत असतील, तर तो सुगम संगीत किंवा सिनेसंगीत चांगले गाऊ शकतो. एक गाणे १० ते १५ वेळा ऐकले की, ते गाणे हा मनुष्य जसेच्या तसे गाऊ शकतो, अगदी ताना (टीप १) आणि आलाप (टीप २) यांसह !

टीप १ – रागातील स्वरांच्या जलद गतीने केलेल्या विस्तारास ‘तान’, असे म्हणतात.

टीप २ – रागदर्शक स्वरांचा संथ गतीने केलेला विस्तार म्हणजेच ‘आलाप’ होय. स्वरांचा उच्चार केवळ ‘आऽऽऽ’कारात करणे म्हणजे ‘आलाप’.

२. स्पर्धांच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळालेल्या गायकांना संगीताचे ज्ञान न होणे

याचा प्रत्यय आपल्याला दूरचित्रवाहिन्यांवर होणाऱ्या स्पर्धांच्या कार्यक्रमांमध्ये (‘रिॲलिटी शो’मध्ये) लहान मुलांचे गायन ऐकतांना येतो. त्यातून दुधात साखर म्हणून जर आवाजाची दैवी देणगी असली, तर तो गायक श्रोत्याला भरपूर आनंद देऊ शकतो. लोक त्याला डोक्यावर घेतात. पुढे तो पैसा आणि प्रसिद्धीही भरपूर मिळवतो; परंतु या पूर्ण प्रवासात त्याला संगीताचे ज्ञान होते का ? तर याचे उत्तर येईल ‘नाही’ ! मनाने चित्र काढणे आणि एखादे चित्र पाहून ते तसे हुबेहूब काढणे, यांत अंतर आहे. मनाने चित्र काढण्यामागे तपश्चर्या असते. प्रत्येक प्रतिमा जाणून घेऊन ती स्मरणात ठेवून त्या प्रमाणात कागदावर उतरवणे, याला अभ्यास आणि व्यासंग लागतो.

३. शास्त्रीय संगीतातील राग ही ‘विस्तारक्षम रचना’ असल्यामुळे गायकामध्ये कल्पकता, सौंदर्यदृष्टी आणि रचनाशास्त्र हे गुण आवश्यक असणे

सुगम संगीत ही ‘अविस्तारक्षम रचना’ असते, तर शास्त्रीय संगीतातील राग ही ‘विस्तारक्षम रचना’ असते. ‘एखाद्या स्वरसमुहाचा विस्तार करून त्यातून एक आनंददायी, सुस्वरूप स्वराकृती कशी सिद्ध करावी ?’, हे गायकाला कळावे लागते. त्यासाठी त्याच्याकडे कल्पकता, सौंदर्यदृष्टी आणि रचनाशास्त्र हे घटक किंवा गुण असावे लागतात. ते सुगम संगीत गायकाकडे असले पाहिजेच, असे नाही; कारण ते सर्वकाही संगीतकाराने बघितलेले असते. गीताची चाल सिद्ध असते, तसेच ‘ते कसे म्हणायचे ?’, ते संगीतकार शिकवतो. त्यामुळे ते सादर करण्याचे दायित्व केवळ गायकाकडे असते. त्याला स्वतःची बुद्धी वापरायची नसते.

४. सुगम संगीत गाण्यासाठी शास्त्रीय संगीत येणे आवश्यक नसणे; मात्र गायकाला गीतातील अर्थ आणि भावना कळणे अत्यंत आवश्यक असणे

मुळात शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत हे दोन भिन्न प्रांत आहेत. सुगम संगीत विस्तारित करायचे नसते. ते आहे तसे गायचे असते आणि तेच लोकांना आवडते.

नेहमी एक प्रश्न विचारला जातो, ‘सुगम संगीत येण्यासाठी शास्त्रीय संगीत शिकावे का ?’ मी तर म्हणेन ‘नाही’. सुगम संगीत गाण्यासाठी शास्त्रीय संगीत शिकायलाच हवे, असे नाही. ज्याला स्वर आणि ताल यांचे चांगले ज्ञान आहे अन् जो चांगली नक्कलही करू शकतो, त्याला नुसते ऐकूनही सुगम संगीत गाता येऊ शकते; मात्र गायकाला गीताचा अर्थ आणि त्यातील भावना कळणे अत्यंत आवश्यक असते. त्याला काव्याचा थोडाफार व्यासंग असावा लागतो. नक्कल ही जिवंत असावी. अर्थ लक्षात न घेता आणि त्यात आवाजाच्या माध्यमातून भावना न ओतता जर नुसती चाल उत्कृष्ट गायली, तर ते गाणे रंगहीन आणि प्राण गमावलेले, असे होईल.

५. ‘झाडावर उमललेले फूल तोडून देवाला अर्पण करणे’, म्हणजे ‘सुगम संगीत’ आणि ‘झाडावर फूल निर्माण करणे’, म्हणजे शास्त्रीय संगीत होय.

६. सुगम संगीत किंवा सिनेसंगीत गाऊन कलाकार लौकिक अर्थाने यशस्वी होत असले, तरी त्यांना शास्त्र समजून न घेतल्याबद्दल पश्चात्ताप होणे

सुगम संगीत किंवा सिनेसंगीत गाऊन कलाकार लोकांचे मनोरंजन करतात. त्यांना प्रसिद्धी मिळते, तसेच त्यांचे परदेश दौरेही होतात. कलाकार लौकिक अर्थाने यशस्वी होतो. तो जगातील सर्व सुखे मिळवतो. त्याच्या आयुष्यातील वेळ सुखा-समाधानात जातो. त्याला क्षणापुरते सुख मिळते. लोकांच्या स्तुतीतून त्याचा अहंकार पोसला जातो. तो स्वतःला ‘महान’ समजू लागतो; पण त्यातून त्याच्या हाती नवे ज्ञान गवसत नाही. खऱ्या ज्ञानाकडे त्याची पावले वळतच नाहीत.

वाद्यवृंदात गाणाऱ्या बऱ्याच गायकांचे असेच होते. काही वर्षांनी त्यांना जाणीव होते, ‘अरे, आपण जन्मभर नक्कलच करत राहिलो. स्वतःचे गाणे कधीच गायले नाही. शास्त्र समजून घेतले नाही. स्वरसरोवरात कधीच आकंठ स्नान केले नाही.’ मग ते पश्चात्ताप करत बसतात. वाद्यवृंदातील तबलजींचेही असेच होते. त्यांची हयात ‘दादरा’, ‘केरवा’ आणि ‘रूपक’ हे ताल वाजवण्यात जाते.

७. ताला-सुराचे ज्ञान अल्प असणारे सुगम संगीत शिकू शकतात !

जगात प्रत्येकाला गाण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला गावेसे वाटते; पण कुणाला सुराचे, तर कुणाला तालाचे ज्ञान अल्प असते. मग काय बरे करावे ? अशा लोकांनी मात्र सुगम संगीतसुद्धा शिकायला हरकत नाही. स्वरज्ञान होण्यासाठी १२ स्वरांचे (टीप ३) नाद समजून घ्यावेत. ‘आरोह (टीप ४) म्हणजे काय ? अवरोह (टीप ५) म्हणजे काय ? आवाज कसा वळवावा ? शब्दोच्चार कसे करावेत ? आवाजात चढ-उतार कसा करावा ?’, हे त्यातील तज्ञ माणसाकडून शिकून घ्यावे. त्याचा नियमित सराव करावा. आपल्या स्वतःच्या आनंदासाठी गात रहावे. गाण्यातला जितका आनंद मिळेल, तेवढा घेत रहावा आणि आयुष्य समृद्ध करावे.

टीप ३ – ७ शुद्ध स्वर, ४ कोमल स्वर आणि १ तीव्र स्वर

टीप ४ – स्वर क्रमाक्रमाने चढवत जाण्याच्या क्रियेला ‘आरोह’, असे म्हणतात, उदा. सा रे ग म प ध नी सां ।

टीप ५ – स्वर क्रमाक्रमाने उतरवत येण्याच्या क्रियेला ‘अवरोह’, असे म्हणतात, उदा. सां नी ध प म ग रे सा ।’

– (पू.) श्री. किरण फाटक, डोंबिवली, जिल्हा ठाणे. (१७.६.२०२१)