हिजाब प्रकरणातील विद्यार्थिनी मुस्कान खान हिचे ‘अल् कायदा’चा प्रमुख अल् जवाहिरी याच्याकडून कौतुक

नवी देहली – कर्नाटकातील हिजाब प्रकरणाच्या वेळी शिगमोग्गा येथे एका शाळेच्या परिसरात मुस्कान खान नावाच्या विद्यार्थिनीने हिजाबला विरोध करणार्‍या विद्यार्थ्यांसमोर ‘अल्लाहू अकबर‘च्या (‘अल्ला महान आहे’च्या) घोषणा दिल्या होत्या. तिचे ‘अल् कायदा’ या कट्टर जिहादी आतंकवादी संघटनेचा नेता अयमान अल् जवाहिरी याने कौतुक केले आहे.

अल् कायदाचे अधिकृत माध्यम असलेल्या ‘शबाब’ या प्रसारमाध्यमाने प्रदर्शित केलेल्या एका व्हिडिओमध्ये अल् जवाहिरी म्हणतो, ‘सामाजिक माध्यमांवर मुस्कानचा व्हिडिओ पाहून मी अगदी प्रभावित झालो आहे. त्यामुळे तिच्या कौतुकार्थ मी एक कविता लिहिली आहे.’ यानंतर तो या कवितेचे वाचन करतांना दिसत आहे. अल् कायदाने हा व्हिडिओ ‘भारताची महान महिला’ अशा शीर्षकाखाली प्रसारित केला आहे.

भारतीय मुसलमानांना चिथावणी

या व्हिडिओमध्ये अल् जवाहिरी याने भारतातील मुसलमानांना या (हिजाबच्या)  ‘अत्याचारा’च्या विरोधात प्रतिक्रिया देण्याचे आवाहन केले आहे.