१. साधिकेने आश्रमातील अन्नपूर्णा कक्षात विरजण लावण्याची सेवा करणे
‘मी रामनाथी आश्रमातील अन्नपूर्णा कक्षात (स्वयंपाकघरात) सेवा करते. मी प्रतिदिन दुपारी १२.३० वाजता विरजण लावण्याची (थोड्याशा कोमट दुधात अगदी थोडेसे दही किंवा ताक घालून ते झाकून ठेवणे) सेवा करते. सर्वसाधारणपणे दुधात विरजण घातल्यावर ४ ते ४.३० घंट्यांत दही तयार होते. वातावरण थंड असल्यास यापेक्षाही अधिक वेळ लागतो.
२. अकस्मात् एका संतांच्या घरी दुपारी ताक पाठवण्याचा निरोप येणे, त्या वेळी पहिले ताक शिल्लक नसणे आणि १ घंट्यापूर्वी लावलेले विरजण पाहिले असता दही तयार झाल्याचे आढळणे
एके दिवशी देवाने दिलेल्या विचारानुसार मी नेहमीपेक्षा लवकर, म्हणजे ११.४५ वाजता दुधाला विरजण लावले. दुपारी १२.४५ वाजता मला अकस्मात् ‘दुपारी १ वाजता एका संतांच्या घरी १ लिटर ताक पाठवायचे आहे’, असा निरोप मिळाला. त्या वेळी पहिले दही किंवा ताक काहीच शिल्लक नव्हते आणि १ वाजता ताक पाठवायचे होते. तेव्हा माझ्या मनात १ घंट्यापूर्वी लावलेले विरजण पहाण्याचा विचार आला आणि मी ते पाहिले. ही कृती माझ्याकडून सहजतेने आणि निर्विचार अवस्थेत झाली. आश्चर्य म्हणजे गुरुकृपेने १ घंट्यातच दूध विरजून दही तयार झाले होते. त्यामुळे मी त्या दह्याचे ताक करून संतांच्या घरी पाठवू शकले.
‘परात्पर गुरु डॉक्टर, तुमची कृपा असल्याने आणि आश्रमातून ताक पाठवणे आवश्यक असल्याने देवतांनी येऊन साहाय्य केले’, असे मला वाटले.’
– सौ. साधना अशोक दहातोंडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.२.२०२२)
‘सेवेत अडथळे येणे’, हे कर्तेपण गुरुचरणी अर्पण करणे आणि देवाचे अस्तित्व अनुभवणे, यांसाठी मिळालेली एक सुवर्णसंधी असते’, हे अनुभूतीतून शिकायला मिळणे
‘माझी पत्नी सौ. साधना यांनी १ घंट्यात दही तयार झाल्याची अनुभूती मला सांगितली. त्या वेळी ‘घडणारे प्रसंग आणि सेवेत येणारे अडथळे’, म्हणजे शरणागत होऊन गुरुचरणी कर्तेपणा अर्पण करणे, श्री गुरूंची कृपा अनुभवणे आणि श्री गुरु अन् देवता यांचे अस्तित्व अनुभवणे, यांसाठी गुरुकृपेने मिळालेली सुवर्णसंधीच असते’, हे या अनुभूतीतून मला शिकायला मिळाले.
‘हे सच्चिदानंद परब्रह्मस्वरूप परात्पर गुरु डॉक्टर, या अनुभूतीच्या माध्यमातून तुम्ही ईश्वरप्राप्तीच्या पथावर पुढे पुढे जाण्यासाठीचा दिव्य सिद्धांत मला शिकवला. त्याबद्दल मी तुमच्या श्री चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– आपल्या चरणकृपेस पात्र होण्यासाठी धडपडत असणारा अपात्र जीव,
श्री. अशोक शांताराम दहातोंडे, देहली सेवाकेंद्र (१२.२.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |