रशियाच्या सैनिकांकडून निरपराध नागरिकांच्या हत्या ! – युक्रेनचा आरोप

कीवच्या सीमेवरील भागात सापडले ४१० मृतदेह

चर्चच्या परिसरात खोदलेला खड्डा

कीव (युक्रेन) – रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धाच्या ४० व्या दिवशी रशियाचे सैन्य युक्रेनची राजधानी कीवच्या सीमेवरील भागापासून पुन्हा माघारी जात आहे; मात्र माघारी जातांना त्यांच्याकडून युक्रेनच्या नागरिकांच्या हत्या केल्याचे युक्रेनच्या सैनिकांना आढळून आले आहे. आतापर्यंत येथे ४१० हून अधिक मृतदेह सापडले आहेत. तसेच त्यांच्यापैकी काही मृतदेहांना स्फोटके बांधल्याचेही लक्षात आले आहे. त्यामुळे हे मृतदेह हालवतांना अडचणी येत आहेत. यातील अनेकांचे हात बांधले होते आणि कपाळांवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. एका अमेरिकी आस्थापनाने उपग्रहाच्या माध्यमातून काढलेली कीवची काही छायाचित्रे प्रकाशित केली आहेत. यामध्ये मृतदेहांना पुरण्यासाठी कीवमधील चर्चच्या परिसरात ४५ फूट लांबीचा खड्डा खोदण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

१. युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्री कुलेबा यांनी रशियाची तुलना आतंकवादी संघटनांशी केली. त्यांनी रशियाच्या सैन्याला इस्लामिक स्टेटपेक्षा वाईट म्हटले आहे. ते म्हणाले की, बुका शहरातून माघार घेत असतांना रशियाचे सैनिक रागाच्या भरात नागरिकांची नाहक हत्या करत होते, युक्रेनियन त्यांना विरोधही करत नव्हते. बुका हत्याकांड ही सुनियोजित रणनीती आहे. शक्य तितक्या युक्रेनियन नागरिकांना मारणे, हे रशियाचे उद्दिष्ट आहे.

२. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेंस्की यांचे सल्लागार मिखाइलो पॉडल्याक यांनी म्हटले की, कीव प्रदेशातील स्थिती २१ व्या शतकातील सर्वांत वाईट आपत्ती आहे. नाझींचा सर्वांत घृणास्पद गुन्हा आता युरोपमध्ये परत आला आहे.

‘ग्रॅमी’ पुरस्कारांच्या मंचावर झेलेंस्की यांचे आवाहन

ग्रॅमी’ पुरस्कारांच्या मंचावर झेलेंस्की आवाहन करताना

‘ग्रॅमी’ पुरस्कार (संगीत क्षेत्रातील पुरस्कार) सोहळ्याच्या वेळी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांचा व्हिडिओ संदेश प्रसारित करण्यात आला. त्यात ते म्हणाले, ‘‘तुम्ही युक्रेनला साहाय्य करा. सर्वत्र उद्ध्वस्त शहरे आणि मृत लोक दिसत आहेत. ही भयाण शांतता संगीताने भरून टाका.’’