पू. राजाराम भाऊ नरुटे (वय ८९ वर्षे) यांनी संतपद प्राप्त केल्याचे घोषित झालेल्या भावसोहळ्याचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘१४ मार्च २०२२ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात एका भावसोहळ्यामध्ये पू. राजाराम भाऊ नरुटे (वय ८९ वर्षे) यांनी संतपद प्राप्त केल्याची आनंददायी घोषणा श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केली. देवाच्या कृपेने मला पू. नरुटेकाका यांची पुढील आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये जाणवली आणि त्यांच्या संतसोहळ्याचे सूक्ष्म परीक्षण होऊन पुढील सूत्रे जाणवली.

पू. राजाराम नरुटे

१. पूर्वसूचना मिळणे

१३ मार्च २०२२ या दिवशी सनातनचे साधक श्री. शंकर नरुटे यांनी माझी ओळख त्यांच्या संपूर्ण कुटुंबाशी करून दिली. तेव्हा पू. राजाराम नरुटेकाकांना पाहिल्यावर  ‘त्यांना वाकून नमस्कार करायला हवा’, हा विचार माझ्या मनात सतत येत होता. त्यामुळे आमचे संभाषण झाल्यावर जेव्हा मी त्यांना वाकून नमस्कार केला, तेव्हा मला त्यांच्याकडून पुष्कळ प्रमाणात चैतन्य माझ्या दिशेने येतांना जाणवले आणि माझ्यावर पुष्कळ प्रमाणात आध्यात्मिक उपाय झाले. तेव्हा ‘ श्रीनरुटेकाका संत झाले असून त्यांना ‘पू.’ नरुटेकाका’, असे संबोधायला हवे’, असे मला तीव्रतेने जाणवले. ‘१४ मार्च २०२२ या दिवशी झालेल्या भावसोहळ्यामध्ये जेव्हाश्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी पू. नरुटे काकांचे संतपद घोषित केले, तेव्हा ‘मला आदल्या दिवशी या संदर्भात पूर्वसूचना मिळाली होती’, हे लक्षात आले आणि देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.

२. पू. नरुटेकाका दिवसभर बालकभावात राहून श्री विठ्ठलाच्या अखंड अनुसंधानात असल्याचे जाणवणे

पू. नरुटेकाकांचे मन बालकाप्रमाणे निरागस आणि निरामय आहे. त्यामुळे त्यांच्या मुखावर बालकभाव जाणवतो. ‘ते दिवसभर बालकभावात राहून श्री विठ्ठलाच्या अखंड अनुसंधानात असतात’, असे मला जाणवले.

३. पू. नरुटेकाकांच्या जीवनात ‘भक्तीयोग, ज्ञानयोग आणि कर्मयोग’, या प्रमुख तीन योगमार्गांचा त्रिवेणी संगम झालेला असणे

कु. मधुरा भोसले

पू. काका मुळात भक्तीमार्गी आहेत. त्यांनी वारकरी संप्रदायानुसार साधना करतांना भक्तीमार्गानुसार श्रीविठ्ठलाची उपासना केली.  भक्तीयोगाने उपासना करत असतांना त्यांच्या मनात हिंदु धर्म आणि अध्यात्म यांच्या संदर्भात जिज्ञासा जागृत झाली. त्यामुळे त्यांच्यावर श्री विठ्ठलाने कृपा करून त्यांना धर्म आणि अध्यात्म यांचे ज्ञान दिले. या ज्ञानामुळे त्यांच्या भक्तीयोगाला ज्ञानयोगाची जोड मिळाली. जेव्हा पू. काकांना धर्म आणि अध्यात्म यांचे ज्ञान मिळते, तेव्हा ते त्या ज्ञानानुसार आचरण करतात. त्यामुळे त्यांच्या ज्ञानयोगाला कर्मयोगाची जोड मिळाली. अशाप्रकारे पू. नरुटेकाकांच्या जीवनात ‘भक्तीयोग, ज्ञानयोग आणि कर्मयोग’, या प्रमुख तीन योगमार्गांचा त्रिवेणी संगमच झालेला आहे. ‘ते केवळ धर्म आणि अध्यात्म यांच्या संदर्भात बोलत नसून त्यानुसार आचरणही करतात. त्यामुळे त्यांची शीघ्र आध्यात्मिक उन्नती होऊन त्यांनी संतपद गाठले आहे’, असे श्री विठ्ठलाने मला सांगितले.

४. पू. नरुटेकाका यांचा अहं अत्यल्प असल्याची काही उदाहरणे

अ. संतपद घोषित होण्यापूर्वी आदल्या दिवशी झालेल्या भेटीत जेव्हा मी पू. काकांना वाकून त्यांच्या चरणांना स्पर्श करून नमस्कार केला, तेव्हा माझी काहीही पात्रता नसतांना त्यांनी मला वाकून नमस्कार केला.

आ. पू. काकांचा अहं अत्यल्प असल्यामुळे ते दिवसभर सहजावस्थेत वावरतात. ‘त्यांचे स्वत:चे निराळे अस्तित्व आहे’, असे त्यांच्या वागण्यातून किंवा बोलण्यातून अजिबात जाणवत नाही.

इ. पू. काका श्री विठ्ठलाचे परम भक्त आणि ज्ञानी असूनही त्यांच्यामध्ये लेषमात्रही अहं जाणवत नाही. ते सर्वांशी पुष्कळ नम्रतेने आणि प्रीतीने बोलतात.

५. पू. काकांना मिळणार्‍या ज्ञानाची वैशिष्ट्ये

अ. त्यांना बोलीभाषेत ज्ञान मिळते.

आ. ज्ञान समजण्यासाठी कठीण नसून ते अत्यंत सरळ आणि सोप्या भाषेत असते.

इ. ज्ञान ऐकत असतांना त्यांतील चैतन्यामुळे ‘ते ऐकतच रहावे’, असे वाटते.

ई. ते देत असलेल्या ज्ञानातील उदाहरणांच्या मागे गूढ अध्यात्मिक ज्ञान दडलेले असते.

उ. त्यांचे ज्ञान ऐकून मला (कै.) पू. बांद्रे महाराज यांची आठवण आली. पू. बांद्रे महाराजांना मिळणार्‍या ज्ञानाप्रमाणे पू. नरुटेकाकांना मिळणारे ज्ञानही केवळ तात्त्विक नसून प्रायोगिक स्तरावरीलही आहे.

६. पू. काकांच्या जन्मापासून संतपदापर्यंतच्या साधना प्रवासाचे अवलोकन करत असतांना त्यांचा साधनाप्रवास शक्तीकडून भक्तीकडे आणि भक्तीकडून ज्ञानाकडे झाल्याचे अन् पुढील प्रवास ज्ञानोत्तर भक्तीकडे होणार असल्याचे श्री विठ्ठलाने सांगणे

पू. काकांच्या जन्मापासून संतपदापर्यंतच्या साधना प्रवासाचे अवलोकन करत असतांना मला प्रथम त्यांच्या बालपणाचे दृश्य दिसले. तेव्हा त्यांच्या नाभीच्या ठिकाणी शक्तीप्रधान असणार्‍या लाल रंगाच्या नाभीकमळाचे दर्शन झाले. त्यानंतर मला त्यांच्या तारुण्यातील दृश्य दिसून त्यांच्या हृदयात उमललेल्या आणि भक्तीप्रधान असणार्‍या निळसर रंगाच्या दैवी कमळाचे दर्शन झाले. त्यानंतर त्यांच्या वृद्धावस्थेत झालेल्या भावसोहळ्यात त्यांचे संतपद घोषित झाल्यावर त्यांच्या सहस्रारचक्राच्या ठिकाणी उमललेल्या पिवळसर रंगाच्या ज्ञानकमळाचे दर्शन झाले. अशाप्रकारे श्री. नरुटेकाका यांच्या जीवनाचा प्रवास शक्तीकडून भक्तीकडे आणि भक्तीकडून ज्ञानाकडे झाल्याचे जाणवले. त्यानंतर ‘काही दिवसांनी त्यांचा निर्गुणाकडे जाणारा प्रवास हा ज्ञानोत्तर भक्तीच्या स्वरूपाचा असणार आहे’, असे श्री विठ्ठलाने मला सांगितले.

७. कार्यक्रमाचा आरंभ होण्यापूर्वी व्यासपिठाच्या उजव्या बाजूला ठेवलेल्या श्रीकृष्णाच्या चित्राकडे पहात असतांना श्रीकृष्णाचे रूपांतर श्री विठ्ठलामध्ये झाल्याचे दिसणे

कार्यक्रमाच्या आरंभी व्यासपिठाच्या उजव्या बाजूला ठेवलेल्या श्रीकृष्णाच्या चित्राच्या ठिकाणी श्रीकृष्णाच्या रूपाचे रूपांतर श्री विठ्ठलामध्ये झाल्याचे जाणवले. त्यानंतर कार्यक्रमस्थळी निळसर रंगाचा दैवी प्रकाश आणि बुक्क्याचा सुगंध पसरून वैकुंठाचे दैवी वायूमंडल निर्माण झाल्याचे जाणवले.

८. पू. नरुटेकाकांचे कार्यक्रमस्थळी शुभागमन झाले, तेव्हा त्यांच्या हृदयातून ‘विठ्ठल विठ्ठल’ हा नामजप टाळ आणि चिपळ्या यांच्या नादासहित मला ऐकू येणे अन् त्यांचा पश्यंती वाणीमध्ये होणार्‍या नामजपाचे महत्त्व मला अनुभूतीच्या स्वरूपात उमजणे

जेव्हा पू. नरुटेकाकांचे कार्यक्रमस्थळी शुभागमन झाले, तेव्हा त्यांच्या हृदयातून ‘विठ्ठल विठ्ठल’ हा नामजप टाळ आणि चिपळ्या यांच्या नादासहित ऐकू आला. तेव्हा त्यांच्या देहाभोवती ‘विठ्ठल विठ्ठल’ हा नामजप पिवळ्या रंगाच्या चैतन्यदायी अक्षरांमध्ये फिरत असल्याचे जाणवले. तेव्हा देवाने मला सांगितले की, ‘पू. नरुटेकाका यांचा नामजप पश्यंती वाणीमध्ये होत असल्यामुळे तुला त्यांच्या हृदयातील नामजप प्रत्यक्ष पहायला मिळाला.’ पूर्वकाळात भारतातील ऋषिमुनी भगवंताची आराधना करत असतांना त्यांच्या भोवतीही भगवंताचा नामजप अशा प्रकारे त्यांना प्रदक्षिणा घालत असे. हा नामजप चैतन्याने ओतप्रोत भरल्यामुळे तो पिवळसर रंगामध्ये दिसला. अशाचप्रकारे जेव्हा पश्यंती वाणीतील नामजप संत आणि ऋषिमुनी यांच्या देहाभोवती सूक्ष्मातून प्रदक्षिणा घालत असतो, तेव्हा नामजपातील चैतन्यामुळे संत अणि ऋषिमुनी यांच्या केवळ स्थूल देहाचीच नव्हे, तर त्यांच्या सूक्ष्म देहांचीही शुद्धी होऊन त्यांचे पिंडरूपी सूक्ष्म अस्तित्व नामरूपी ईश्वरी चैतन्याशी एकरूप होते. या अनुभूतीतून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘नामसंकीर्तनयोग’ या ग्रंथात वर्णन केलेल्या ‘पश्यंती वाणीतील नामजप’ याचे महत्त्व मला उमजले.

९. भोवसोहळ्याच्या आरंभी ‘भक्तवत्सल श्री विठ्ठल रुक्मिणी मातेसह कार्यक्रमस्थळी अवतरला आहे’, असे जाणवणे

जेव्हा भावसोहळा चालू झाला, तेव्हा पू. नरुटेकाकांच्या ठिकाणी संत सावतामाळी, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या ठिकाणी रुक्मिणीमाता आणि व्यासपिठावरील दोन्ही संतांच्या आसंदीच्या मध्ये कटीवर हात ठेवलेल्या श्री विठ्ठलाच्या सावळ्या आणि सुंदर रूपाचे दर्शन झाले. तेव्हा  ‘भक्तवत्सल श्री विठ्ठल रुक्मिणी मातेसह कार्यक्रमस्थळी अवतरला आहे’, असे जाणवले.

१०. संतसोहळ्याला उपस्थित असणार्‍या साधकांना पू. नरुटेकाकांच्या चैतन्यमय वाणीतून धर्माचरण आणि साधना यांच्या संदर्भातील दिव्य ज्ञानाची प्राप्ती होणे

जेव्हा पू. नरुटेकाका बोलत होते, तेव्हा त्यांच्या डोक्यावर ज्ञानाचा पिवळसर रंगाचा प्रकाशझोत पडल्याचे दिसले. या प्रकाशझोतातून ज्ञानाचे पिवळे किरण त्यांच्या सहस्रारचक्रावाटे त्यांच्या देहात गेले आणि त्यांच्या वाणीतून स्थुलातील शब्दांच्या रूपाने वातावरणात प्रक्षेपित झाले. त्यामुळे संतसोहळ्याला उपस्थित असणार्‍या साधकांना पू. नरुटेकाकांच्या चैतन्यमय वाणीतून धर्माचरण आणि साधना यांच्या संदर्भातील दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली.

११. जेव्हा पू. नरुटेकाकांनी संतपद प्राप्त केल्याचे श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी घोषित केल्यावर सूक्ष्म स्तरावरी जाणवलेली सूत्रे

११ अ. पू. नरुटेकाकांच्या विविध कुंडलिनीचक्रांतून सभोवतालच्या वातावरणात ज्ञान, चैतन्य आणि भक्ती यांचे दैवी प्रकाशझोत प्रक्षेपित होणे : पू. नरुटेकाकांच्या सहस्रारचक्रातून ज्ञानाचा पिवळसर पांढरा, आज्ञाचक्रातून चैतन्याचा पिवळसर आणि हृदयातून भक्तीचा निळसर या रंगांचे दैवी प्रकाशझोत वातावरणात प्रक्षेपित झाले. त्यामुळे संपूर्ण वातावरण ज्ञान, चैतन्य आणि भक्ती यांच्या तरंगांनी भारित होऊन उजळून निघाले.

११ आ. साक्षात् श्री विठ्ठलानेच पू. नरुटेकाकांचा सन्मान केल्याचे जाणवणे आणि त्यानंतर श्री विठ्ठलाने पू. नरुटेकाकांना प्रेमाने आलिंगन देणे : जेव्हा पू. पृथ्वीराज हजारेकाका यांनी पू. नरुटेकाका यांच्या गळ्यात पुष्पहार घालून त्यांचा सन्मान केला, तेव्हा साक्षात् श्री विठ्ठलानेच पू. नरुटेकाकांचा सन्मान केल्याचे जाणवले. त्यानंतर श्री विठ्ठाला इतका आनंद झाला की, त्याने पू. नरुटेकाकांना प्रेमाने आलिंगन दिले. त्या वेळी मला ‘भक्त आणि भगवंत यांची भेट कशी असते’, हे प्रत्यक्ष अनुभवण्यास मिळाले आणि श्री विठ्ठलाचे त्याच्या भक्तांप्रती असणारे वात्सल्यही अनुभवण्यास मिळाले.

११ इ. श्री विठ्ठलाने पू. नरुटेकाकांच्या स्वागतासाठी भूलोकापासून वैकुंठापर्यंत चैतन्यदायी पायघड्या घालून त्यांच्या सूक्ष्मरूपाचे भव्य स्वागत करणे : हा सोहळा पहाण्यासाठी श्री विठ्ठलाने वारकरी संप्रदायात होऊन गेलेले संत नामदेव, संत गोरा कुंभार, संत सावतामाळी, संत चोखामेळा, संत सखुबाई, संत मुक्ताबाई इत्यादी विठ्ठलभक्त संतांचे रूप धारण केले होते. या संतरूपातील विठ्ठलाने त्याचे लाडके भक्त संत पू. नरुटेकाका यांना सूक्ष्मातून वैकुंठात नेण्यासाठी त्यांच्या स्वागताप्रीत्यर्थ भूलोकापासून वैकुंठापर्यंत चैतन्याचा पिवळ्या रंगाचा गालीचा अंथरून तो फुलांनी सुशोभित केला होता. या चैतन्याच्या पायघड्यांच्या दोन्ही बाजूला भावाच्या ज्योती प्रज्वलित झालेल्या पणत्या लावल्या होत्या. पू. नरुटेकाकांचे संतपद घोषित झाल्यामुळे त्यांचे सूक्ष्म रूप कायमचे वैकुंठात वास करणार आहे. अशाप्रकारे श्री विठ्ठलाने पू. नरुटेकाकांचे भव्य स्वागत करून त्यांचे सूक्ष्मरूप वैकुंठात नेल्याचे जाणवले. यावरून ‘एखादा भक्त जेव्हा संतपद गाठतो, तेव्हा भगवंताला किती आनंद होतो’, हे मला अनुभवायला मिळाले.

११ ई. ‘पू. नरुटेकाकांनी संतपद प्राप्त केल्यामुळे त्यांना आता स्थुलातून पंढरपूरला माझ्या दर्शनाला येण्याची आवश्यकता नसून मीच त्यांच्या हृदयमंदिरात आणि त्यांच्या घरात कायमचा वास करणार आहे’, असे श्री विठ्ठलाने सांगणे : त्यानंतर मला विठ्ठलभक्तीत रंगून गेलेल्या वारीतील वारकर्‍यांचे भावमय दर्शन झाले. तेव्हा श्री विठ्ठलाने मला सांगितले की, ‘आता पू. नरुटेकाकांना स्थुलातून पंढरपूरला येण्याची आवश्यकताच नाही. मीच त्यांच्या  हृदयमंदिरात आणि घरात कायमचा वास करणार आहे.’ यावरून पू. नरुटेकाकांच्या निस्सीम विठ्ठलभक्तीमुळे त्यांच्यावर श्री विठ्ठलाने केलेल्या भक्तीची प्रचीती आली.

११ उ. पू. नरुटेकाकांनी ‘त्यांच्या जीवनातील कटु प्रसंग, पत्नीच्या निधनाचा प्रसंग, स्वत:च्या संतपदाची घोषणा आणि सन्मान’ या सर्व घटनांकडे साक्षीभावाने पाहिल्याचे श्री विठ्ठलाने सांगणे : जेव्हा ते संत झाल्याचे घोषित झाले आणि त्यानंतर त्यांचा सन्मान करण्यात आला, तेव्हा ‘ते स्वत:च्या सन्मानाकडे साक्षीभावाने पहात आहेत’, असे जाणवले. अशाचप्रकारे त्यांच्या पत्नीच्या निधनाच्या वेळी आणि त्यांच्या जीवनातील अप्रिय घटनांच्या वेळीही ते साक्षीभावात होते’, असे श्री विठ्ठलाने मला सांगितले. यावरून ‘त्यांच्या व्यष्टी साधनेचा पाया किती भक्कम आहे’, हे सूत्र मला शिकायला मिळाले.

१२. पू. नरुटेकाकांनी ज्ञानयोगाप्रमाणे साधना केल्यामुळे त्यांना आत्मज्ञान मिळणे आणि त्यांची भक्तीयोगानुसार साधना झाल्यामुळे त्यांना आत्मानुभूती येणे

पू. नरुटेकाकांना केवळ हिंदु धर्म आणि अध्यात्म यांच्या संदर्भातीलच ज्ञान मिळत नसून त्यांना आत्मज्ञानही झालेले आहे. त्यामुळे ‘मी मनुष्यदेह नसून आत्मा आहे’, याची जाणीव त्यांना सतत असते. ते आत्मज्ञानासह आत्मानुभूती घेत आहेत. त्यामुळे ते आणि विठ्ठल यांतील द्वैतभाव संपुष्टात येऊन त्यांच्यामध्ये अद्वैत निर्माण होत आहे.

१३. पू. नरुटेकाकांच्या आत्मज्योतीचा आध्यात्मिक प्रवास ब्रह्मज्योतीकडे चालू झालेला असणे

पू. नरुटेकाकांच्या हृदयातील अनाहतचक्राच्या ठिकाणी निळसर रंगाची भक्तीज्योत आणि आज्ञाचक्राच्या ठिकाणी ज्ञानज्योत प्रज्वलित झाल्याचे जाणवले. त्यानंतर या दोन्ही ज्योती एक होऊन ही ज्योत निर्गुणाकडे म्हणजे उर्ध्वदिशेला जातांना दिसली. तेव्हा श्री विठ्ठलाने मला सांगितले की, ‘पू. नरुटेकाकांच्या आत्मज्योतीचा आध्यात्मिक प्रवास ब्रह्मज्योतीकडे चालू झालेला आहे. जेव्हा त्यांचा निर्गुणाचा साधनाप्रवास संपेल, तेव्हा त्यांची आत्मज्योत पूर्णपणे ब्रह्मज्योतीत विलीन होऊन त्यांना मोक्ष मिळेल. मी या दैवी क्षणाची आतूरतेने वाटत पहात आहे.’

१४. श्री विठ्ठलानेच त्याचे भक्त संत पू. नरुटेकाका यांचे एकादशीच्या दिवशी संतपद घोषित करून त्यांच्यावर कृपेचा वर्षाव करणे

१४ मार्च २०२२ या दिवशी ‘आमलकी एकादशी’ होती. ही तिथी श्रीविष्णूशी संबंधित असून विठ्ठलभक्त एकादशीला उपवास करतात आणि पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शनही घेतात. याच दिवशी पू. नरुटेकाका श्री विठ्ठलाचे भक्त असल्यामुळे श्री विठ्ठलाच्याच इच्छेने १४ मार्च २०२२ या दिवशी ‘आमलकी एकादशी’ च्या तिथीला श्री. नरुटेकाकांचे संतपद घोषित होऊन ते पूज्य नरुटेकाका बनले आणि त्यांच्यावर पुष्कळ कृपा केली.

१५. पू. नरुटेकाकांच्या कुटुंबियांचे जाणवलेले वैशिष्ट्य

पू. नरुटेकाकांच्या कुटुंबियांमध्ये देवाप्रतीचा भोळा भाव, निरपेक्षता आणि सेवावृत्ती हे गुण प्रकर्षाने जाणवतात. त्यामुळे त्यांचे तोंडवळे पाहिल्यावर त्यातून निर्मळ लहरी, भाव, चैतन्य आणि आनंद प्रक्षेपित होतो, असे जाणवले.

कृतज्ञता : ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने पू. नरुटेकाकांच्या संतसोहळ्याचे सूक्ष्म परीक्षण करण्याची सेवा झाली आणि त्यांच्याकडून अनेक गुणवैशिष्ट्ये शिकता आली’, यासाठी मी श्रीगुरुचरणी आणि श्री विठ्ठलाच्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहे.’

– कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(१५.३.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक