अमेरिकी डॉलरचे जागतिक स्तरावरील वर्चस्व धोक्यात ! – अमेरिकी बँक

रशियावर घातलेल्या निर्बंधांचा उलट परिणाम

वॉशिंग्टन (अमेरिका) – रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर रशियावर पाश्‍चात्त्य देशांनी पुष्कळ निर्बंध लादले; परंतु त्यांच्या या भूमिकेचा त्यांनाच त्रास होत असल्याचे दिसत आहे. युरोपातील २ सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्था जर्मनी आणि ब्रिटन हे आर्थिक मंदी अन् महागाई वाढ यांच्या उंबरठ्यावर असतांना आता अमेरिकी डॉलरचे जागतिक स्तरावरील वर्चस्वही धोक्यात असल्याची चेतावणी अमेरिकेतीलच जगप्रसिद्ध बँक ‘गोल्डमॅन सॅक्स’ने दिली आहे. ज्याप्रकारे गेल्या शतकाच्या मध्यामध्ये जागतिक व्यवसायासाठी वापरण्यात येणार्‍या ब्रिटनच्या पाऊंडवरील जगाचा विश्‍वास अल्प होऊन त्याची जागा अमेरिकी डॉलरने घेतली, त्याप्रकारे आता अमेरिकी डॉलरची स्थिती होण्याची चिन्हे आहेत, असा दावा या जागतिक बँकेच्या अधिकार्‍यांनी केला आहे.

यामागील कारणे विशद करतांना ‘गोल्डमॅन सॅक्स’च्या अर्थतज्ञांनी म्हटले की,

१. अमेरिकेवर विदेशी कर्ज वाढत असून त्याचे आर्थिक महत्त्व न्यून होत आहे.
२. यासमवेतच रशिया-युक्रेन युद्धात युक्रेनची बाजू घेतल्याने अमेरिकेला विविध समस्याही भेडसावू लागल्या आहेत.


३. अमेरिका ही मोठ्या प्रमाणात वस्तूंची आयात करते. एकीकडे जागतिक चलन म्हणून अमेरिकी डॉलर वापरले जात असले, तरी अमेरिकेचे वाढते विदेशी कर्ज हे जर त्याच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाएवढे होऊ लागले, तर विविध देश डॉलरच्या रूपातील जागतिक चलन वापरण्यापासून परावृत्त होऊ शकतात. यामुळेच डॉलरचे अवमूल्यन होण्याची दाट शक्यता आहे.