चीनमधील २.६ कोटी शांघायवासियांची कोरोना चाचणी होणार !

सैन्याला केले पाचारण !

शांघाय (चीन) – चीनमध्ये कोरोना महामारी पुन्हा एकदा बळावल्याने देशात युद्ध स्तरावर त्यास अटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न चालवले जात आहेत. चिनी सरकारच्या ‘डायनॅमिक झीरो पॉलिसी’ म्हणजे परिस्थितीनुरूप कोरोनाला पूर्ण पायबंद करण्याच्या धोरणामुळे अनेक प्रांतांमध्ये दळणवळण बंदी कठोरतेने राबवली जात आहे.


या अनुषंगानेच देशाच्या आर्थिक राजधानी शांघायमध्ये संसर्गावर अटकाव आणण्यासाठी तेथील २ कोटी ६० लाख लोकांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. त्यासाठी ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ या चिनी सैन्याच्या २ सहस्र सैनिकांना शहरात पाचारण करण्यात आले आहे. शांघायच्या शेजारील दोन प्रांत आणि बीजिंग येथून आधीच १० सहस्र वैद्यकीय अधिकारी  शहरात पोचले आहेत. त्यांच्या साहाय्यासाठी सैन्यालाही बोलावण्यात आले आहे.