संभाजीनगर येथे खेळण्यांच्या नावाखाली कुरिअरद्वारे मागवलेल्या ३६ तलवारी पोलिसांकडून जप्त !

  • ‘डीटीडीसी’ कुरिअर आस्थापनाच्या व्यवस्थापकासह ७ जणांविरुद्ध गुन्हा नोंद !

  • खेळण्यांच्या नावाखाली धारदार शस्त्रे पाठवण्याची सलग तिसरी घटना उघड !

  • या घटनांमागील गुन्हेगार शोधून त्यांना कठोर शिक्षा न करणे पोलिसांना लज्जास्पद ! असे पोलीस जनतेचे रक्षण काय करणार ? – संपादक
  • वारंवार घडणाऱ्या अशा घटनांवरून समाजात पोलिसांचा धाक राहिलेला नाही, हेच स्पष्ट होते ! – संपादक

संभाजीनगर – प्लास्टिक खेळण्यांच्या नावाखाली ‘डीटीडीसी’ या कुरिअर आस्थापनाच्या माध्यमातून पंजाब येथून शहरात आलेल्या तब्बल ३६ तलवारी पोलिसांनी तलवारी जप्त केल्या आहेत. या तलवारी घातपाताच्या उद्देशाने मागवल्या होत्या का ?, याचे अन्वेषण पोलीस करत आहेत. या प्रकरणी आस्थापनाच्या व्यवस्थापकासह ७ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी जप्त केलेल्या तलवारी

‘निराला बाजार परिसरात ‘डीटीडीसी’चे कार्यालय आहे. त्यांच्याद्वारे शहरात तलवारी मागवल्या आहेत’, अशी माहिती साहाय्यक पोलीस आयुक्त अशोक थोरात यांना मिळाली. त्यानंतर या माहितीच्या आधारे त्यांनी क्रांती चौक पोलीस पथकाच्या साहाय्याने सापळा रचून ३६ तलवारी जप्त केल्या. ‘पंजाब राज्यातील अमृतसर येथून हे कुरिअर आले. यावर अर्धवट नावे आणि भ्रमणभाष क्रमांक आहेत. त्यामुळे संबंधित पत्त्यावर रहाणारी व्यक्ती तीच आहे का ? याचे अन्वेषण पोलीस करत आहेत. तलवार मागवणारे ग्राहक पकडल्याविना ‘त्यांचा उद्देश काय होता ?, हे स्पष्ट होणार नाही’, अशी माहिती पोलीस उपायुक्त वनकर यांनी दिली.

शहरातील विविध भागांत कुरिअर आस्थापनांच्या माध्यमातून खेळण्यांच्या नावाखाली धारदार शस्त्रे मागवण्याचा प्रकार यापूर्वी ३ वेळा उघडकीस आला आहे. त्या वेळी पोलिसांनी १०० हून अधिक तलवारी जप्त केलेल्या होत्या. त्यामुळे ‘धारदार शस्त्रे येणार असल्याची माहिती संबंधित कुरिअर आस्थापनालाही असू शकते’, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.