अंतर्मुख, सेवाभावी आणि इतरांना साहाय्य करणारे ६८ टक्के आध्यात्मिक पातळीचे पुणे येथील श्री. महेश पाठक !

मी काही कालावधीसाठी पुणे सेवाकेंद्रात रहात होते. त्या वेळी मला श्री. महेश पाठक यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

श्री. महेश पाठक

१. सहजता

श्री. महेशदादांची त्यांच्यापेक्षा वयाने लहान-थोर सर्व व्यक्तींशी लगेच जवळीक होते. त्यांच्या सहज वागण्यामुळे ‘त्यांची ६८ टक्के आध्यात्मिक पातळी आहे’, असे वाटत नाही. ते व्यष्टी साधना आणि सेवाकेंद्रातील सेवा सहजतेने करतात. त्यांना कधी ताण आल्याचे मी पाहिले नाही.

सौ. स्नेहल केतन पाटील

२. निर्मळ मन

एखादे लहान बाळ जसे आनंदी असते, तसे दादा आनंदी असतात. त्यांच्या मनात कुणाविषयी पूर्वग्रह नसतात.

३. अल्प अहं

ते संगणक अभियंता आहेत. त्यांनी काही वर्षे अमेरिकेत राहूनही नोकरी केली आहे; पण त्यांच्यात याविषयी मुळीच अहं जाणवत नाही.

४. कौटुंबिक दायित्व आनंदाने निभावणे

सौ. मनीषाताईची (श्री. महेश पाठक यांच्या पत्नीची) प्रकृती ठीक नसल्याने दादांना मुलीचे (कु. प्रार्थनाचे) आवरणे, तिची वेणी घालणे, तिला डबा करून देणे, तिला हवे-नको ते बघणे, शाळेत सोडणे, असे सगळे करावे लागते. ते या गोष्टी कोणतेही गार्‍हाणे न करता मनापासून करतात. ते सौ. मनीषाताईचीही मायेने काळजी घेतात. इतके सर्वकाही सहजतेने करणारी व्यक्ती मी प्रथमच पाहिली.

५. प्रेमभाव

अ. दादांकडे सेवाकेंद्रात अल्पाहार आणि महाप्रसाद बनवण्याची सेवा असतांना ते ‘आहे त्या परिस्थितीत साधकांसाठी एखादा नवीन आणि चांगला पदार्थ कसा बनवू शकतो ?’, असा विचार करतात. त्यांच्यातील प्रेमभावामुळे त्यांनी बनवलेले पदार्थ चविष्ट असतात

आ. मला एखादी अडचण आली किंवा काही प्रसंग झाला, तर मी मनमोकळेपणाने दादांशी बोलू शकते. दादांचा मला पुष्कळ आधार वाटतो. नंतर मी कार्यालयीन कामामुळे अन्य ठिकाणी रहायला गेले. तेव्हा ‘मला एकटे वाटू नये’, यासाठी दादा माझी नियमितपणे विचारपूस करायचे.

६. इतरांना साहाय्य करणे

एखाद्या साधकाला सेवेत अडचण आल्यास दादा स्वतःहून ती सेवा पूर्ण करतात. ते सेवा करून थकले असले, तरी इतरांना अधिकाधिक साहाय्य करतात.

७. सतत देवाशी अनुसंधानात रहाणे

त्यांनी एकदा सर्वांसमोर ‘एका प्रसंगामुळे माझा काही मिनिटे वेळ वाया गेला आणि देवाशी अनुसंधान राहिले नाही’, अशी चूक सांगितली. तेव्हा ‘ते सतत देवाच्या अनुसंधानात असतात’, असे लक्षात आले.

८. सेवाभाव

अ. एकदा कु. प्रार्थनाच्या वाढदिवसाच्या दिवशी ‘खडकवासला जलरक्षण मोहीम’ होती. तेव्हा दादांनी प्रार्थनाला साधकांकडे ठेवले आणि सेवेला प्राधान्य दिले. आम्ही रात्री सेवा संपवून तिला घेऊन सेवाकेंद्रात गेलो. तेव्हा ‘माझ्या मुलीच्या वाढदिवसाला मी नव्हतो’, असे दादांना वाटले नाही.

आ. एकदा रात्री कु. प्रार्थना आणि काही साधक यांच्यासाठी डबा बनवायचा होता. तेव्हा भेंडीची भाजी करण्यासाठी मी दादांच्या साहाय्याला गेले. त्या वेळी रात्रीचे ११.३० वाजले असूनही दादा उत्साहाने आणि मनापासून सेवा करत होते. त्यांचे ‘भेंडी व्यवस्थित चिरली आहे का ? फोडणी नीट देतोय ना’, यांकडे लक्ष होते.

९. तत्त्वनिष्ठ

दादा साधकांना प्रेमाने चुका सांगतात. एकदा २ – ३ सेवा एकत्र आल्यावर मला ताण आला होता. मी ‘समोरच्या साधकाला काय वाटेल ?’, या विचारामुळे सेवेविषयी बोलून घेत नव्हते. तेव्हा दादा अल्पाहार करतांना मला सहज म्हणाले, ‘‘कशाला प्रतिमा जपतेस ?’’ त्यांनी या एका वाक्यातून मला अंतर्मुख केले. त्यांनी मला माझ्या अहंच्या पैलूविषयी सहजतेने सांगितले. यामुळे मला स्वभावदोष आणि अहं यांची व्याप्ती काढतांना पुष्कळ साहाय्य झाले.

– कु. स्नेहल गुब्याड (आताच्या सौ. स्नेहल केतन पाटील, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), पुणे (४.८.२०२०)