रशियाकडून ‘हायपरसोनिक’ क्षेपणास्त्राचा वापर आणि युक्रेनची लढाऊ वृत्ती

‘हायपरसोनिक’ क्षेपणास्त्राचे संग्रहित छायाचित्र

(हायपरसोनिक म्हणजे आवाजाच्या गतीपेक्षा ६ पट अधिक वेगाने जाणारे क्षेपणास्त्र)

(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

१. रशियाने युक्रेनच्या विरोधात अत्याधुनिक ‘हायपरसोनिक’ क्षेपणास्त्राचा वापर करणे

रशिया-युक्रेन युद्धाला २६ दिवस उलटून गेले आहेत. रशियाने युक्रेनच्या विरोधात हायपरसोनिक क्षेपणास्त्राचा वापर केला. हायपरसोनिक क्षेपणास्त्र हे अतिशय अत्याधुनिक क्षेपणास्त्र आहे. ते खालच्या पातळीवर उडते आणि त्याची लक्ष्य अचूक साधण्याची शक्यता पुष्कळ अधिक असते. त्यामुळे त्याला कोणतेही रडार थांबवू शकत नाही. जगातील केवळ ४-५ देशांकडेच हे शस्त्र आहे. रशियाने नुकतेच या क्षेपणास्त्राचा युक्रेनच्या एका तळावर  मारा केला. हे क्षेपणास्त्र अतिशय महागडे असल्याने त्याची उपलब्धता अल्प असते. त्यामुळे त्याचा वापर महत्त्वाच्या लक्ष्याच्या विरोधातच केला जातो. सद्यःस्थितीत रशिया हे शस्त्र किती वेळा वापरू शकेल, यावर प्रश्नचिन्ह आहे; कारण आताची लक्ष्य हे शहराच्या आत आहेत. तेथे नागरी लोकवस्ती असल्याने अशा ठिकाणी क्षेपणास्त्रांचा मारा करणे, हे शहाणपणाचे ठरत नाही.

२. युक्रेनच्या नेतृत्वासमवेत सामान्य नागरिकही लढत असल्याने त्यांनी रशियासारख्या महाशक्तीला ‘तोडीस तोड’ प्रत्युत्तर देणे

या युद्धामध्ये युक्रेन रशियाला कशाच्या जोरावर ‘तोडीस तोड’ प्रत्युत्तर देत आहे ? रशिया जगातील दुसरी सर्वांत मोठी सैनिकी शक्ती आहे. त्याच्याकडे मोठ्या संख्येने तोफा, रणगाडे, विमाने आणि हेलिकॉप्टर्स आहेत. त्याच्याकडे कोणत्याही शस्त्रांस्त्रांची कमतरता नाही. त्या तुलनेत युक्रेनकडे शस्त्रास्त्र अल्प प्रमाणात आहेत. अशा परिस्थितीत २६ दिवस होऊनही युक्रेन लढाई कशी करत आहे ? असा प्रश्न पडतो. याची ३ मुख्य कारणे आहेत.

अ. युक्रेनचे सैन्य चांगली लढत देत आहे.

आ. युक्रेनचे सामान्य नागरीक हातात शस्त्र घेऊन रशियाच्या मुख्य गोष्टींवर आक्रमण करत आहेत.

इ. याखेरीज युक्रेनचे राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्व असो किंवा शहराचे महापौर असो, त्यांचे सर्व स्तरावरील नेतृत्व चांगले काम करत आहे. त्यामुळे युक्रेनच्या सैन्यामध्ये विजिगीषु वृत्ती वाढून ते अधिक चांगल्या प्रकारे रशियाचा प्रतिकार करत आहे.

 (सौजन्य : Brig Hemant Mahajan,YSM)

३. रशियाचे सैन्य पारंपरिक युद्ध करण्यास सिद्ध नसल्याने युक्रेनला लढाईचा अधिक चेव चढणे

हे युद्ध चालू झाले, तेव्हा ते काही दिवसांत संपेल आणि युक्रेनचा पराभव होईल, असे वाटले होते; पण तसे झाले नाही. रशियाने त्याचे प्रचंड सैन्य आत आणले आणि युक्रेनच्या शहरांना वेढा दिला. शहराच्या आत गेल्यावरही आपल्याला विविध ठिकाणच्या सैन्याला मारावे लागते. हे करण्यासाठी पायदळाची आवश्यकता असते. त्या वेळी पारंपरिक युद्धच लढावे लागते. अर्थात् यासाठी रशिया सिद्ध नाही. त्यामुळेच युक्रेनला लढाईचा अधिक चेव चढला आहे. आता रशियाचे सैन्य मोठ्या प्रमाणात आत आले आहे. युक्रेनचे लोक रशियाच्या तोफा, रणगाडे, वाहने यांच्यावर गनिमी काव्याने आक्रमण करत आहेत. त्यामुळे रशियाच्या सैन्याची लढण्याची गती अल्प झाली आहे. युक्रेनच्या सैन्याकडे लढण्याची इच्छाशक्ती आहे, तसेच त्यांना युरोपकडून शस्त्रास्त्रेही मिळाली आहेत. याउलट रशियाच्या सैन्याकडे लढण्याची इच्छाशक्तीही नाही. त्यामुळे युक्रेनचे सैन्य इतके दिवस लढत आहे आणि पुढेही लढत राहील.

४. जागतिक पातळीवर युद्ध थांबवण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांना रशियाने दाद न देणे

जागतिक पातळीवर युद्ध थांबवण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांना रशियाने दाद दिली नाही; कारण प्रारंभी ‘आपण सैनिकी बळावर युक्रेनला नमवू’, असे रशियाला वाटले होते; पण तसे काही झाले नाही. हे युद्ध थांबवण्यासाठी काही देश मध्यस्थी करण्यास सिद्ध आहेत. रशियाला कोणत्याही देशाने मध्यस्थी केली, तरी चालेल; पण त्याला ‘युक्रेन हा ‘नाटो’मध्ये (उत्तर अटलांटिक करार संघटनेमध्ये) जाणार नाही’, याची १०० टक्के हमी हवी आहे. दुसरे म्हणजे ते रशियाच्या बाजूने रहातील आणि तिसरे असे की, त्याला युक्रेनमध्ये असे सरकार हवे आहे, जे कायम रशियाचे मांडलिक बनून राहील. रशियाची ही मागणी पूर्ण होत नाही. त्यामुळे रशिया अजूनही युद्धविरामाला सिद्ध नाही. कालांतराने ‘रशियाचे सैन्य या युद्धात परिणामशून्य ठरले असून ते युद्ध जिंकून देऊ शकले नाही’, याची रशियाला जाणीव होईल. त्यामुळे येत्या काळात त्याला सैन्याऐवजी मुत्सद्देगिरीच्या मार्गावर जावे लागेल; पण त्यासाठी थोडा वेळ लागेल.’

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.