आता ‘गोवा इन्क्विझिशन’वर आधारित ‘द गोवा फाइल्स’ चित्रपटाची निर्मिती व्हावी ! – प्रा. सुभाष वेलींगकर, हिंदुत्वनिष्ठ

प्रा. सुभाष वेलिंगकर

पणजी – काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदावर प्रकाश टाकणार्‍या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या धर्तीवर आता ‘द गोवा फाइल्स’ या चित्रपटाची निर्मिती करावी, अशी मागणी प्रखर हिंदुत्वनिष्ठ प्रा. सुभाष वेलींगकर यांनी ट्वीट करून केली आहे.

ट्वीटमध्ये ते पुढे म्हणतात, ‘‘३२ वर्षांपूर्वी काश्मिरी हिंदूंचा वंशविच्छेद करण्यात आला होता. त्या वेळी काँग्रेसधार्जिण्या विचारधारेमुळे काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांना वाचा फुटली नाही. देशात आमुलाग्र सत्तापालट झाला आणि पहिल्यांदाच काश्मीरमधील हिंदूंच्या संहाराचे सत्यकथन ‘कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाद्वारे करण्यात आले. हिंदूंचा वंशविच्छेद झालेला काश्मीर हा एकच भाग नाही, तर गोव्यातही हिंदूंचा नरसंहार झाला होता. चर्च संस्थेने धर्माच्या नावावर पोर्तुगीज सत्ता गोव्यात टिकवण्यासाठी २५० वर्षे ‘इन्क्विझिशन’ (धर्मसमीक्षण) लादून हिंदूंचा वंशविच्छेद केला. हे पुढील पिढीला कळणे आवश्यक आहे. जीनांचा ‘डायरेक्ट ॲक्शन’ (हिंदूंचा वंशसंहार करण्यासाठी मुसलमानांना दिलेला आदेश), नौखाली, हैद्राबाद, केरळचे मोपला येथील हिंदूंची हत्याकांडे, तसेच गांधींच्या हत्येनंतर झालेली हिंदूंची हत्याकांडे आदी हिंदूंना कुठे ठाऊक आहेत ?’’