लाच घेतल्याच्या प्रकरणी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठाचे प्राध्यापक महंमद खालिद मोइन यांना अटक

जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठाचे प्राध्यापक महंमद खालिद मोइन

नवी देहली – जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठाच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक महंमद खालिद मोइन यांना १ लाख रुपये लाच घेतल्याच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (‘सीबीआय’ने) १६ मार्च या दिवशी येथे अटक केली. या प्रकरणी महंमद खालिद मोइन यांचे दोन साथीदार आबिद खान आणि प्रखर पवार यांनाही सीबीआयने कह्यात घेतले आहे. हे दोघे आरोपी नवी देहलीच्या ओखलास्थित एका खासगी आस्थापनामध्ये कार्यरत आहेत.

प्राध्यापक महंमद खालिद मोइन हे अनेक खासगी बांधकाम व्यावसायिक, वास्तूविशारद आणि दलाल यांच्या संगनमताने विविध प्रकारच्या फसवणुकीच्या कारवायांमध्ये गुंतले होते. लाच घेऊन ते विविध बांधकाम प्रकल्पांना बनावट प्रमाणपत्र देत होते. सीबीआयने सापळा रचून त्यांना त्यांच्या सहकार्‍यांसह लाच घेतांना रंगेहाथ पकडले, अशी माहिती सीबीआयचे प्रवक्ते आर्.सी. जोशी यांनी दिली.