न्यूयॉर्क (अमेरिका) – रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध जसजसे भयावह होत चालले आहे, तसतसे युक्रेन सोडून जाणार्या लोकांची संख्याही प्रचंड प्रमाणात वाढत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या या पलायनाचा आकडा आता २० लाखांच्या पार गेल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांचे निर्वासितांशी संबंधित प्रश्न हाताळणारे उच्चायुक्त फिलिप्पो ग्रँडी यांनी दिली आहे. ते म्हणाले की, दुसर्या विश्वयुद्धानंतर प्रथमच एवढ्या अल्प कालावधीत युरोपमध्ये लक्षावधी लोक आश्रय घेत आहेत.
१. सध्या सधन अथवा युरोपीय देशांमध्ये नातेवाईक, मित्र-मंडळी असलेले युक्रेनियन नागरिक देश सोडून जात आहेत; परंतु युद्ध जसे अधिक भडकेल, तसे गरीब युक्रेनियन नागरिकही देश सोडून पलायन करतील. ही स्थिती अधिक चिंताजनक असेल. सर्व युरोपीय राष्ट्रांनी मानवतावादी भूमिका निभवावी, असेही ग्रँडी यांनी युरोपीय राष्ट्रांना आवाहन केले आहे.
२. युक्रेनच्या पूर्वाेत्तर भागात असलेल्या सुमी आणि इर्पिन या शहरांमधून आता पलायन चालू झाले आहे.
३. गेल्या काही दिवसांपासून रशियाने ताबा मिळवलेल्या युक्रेनच्या शहरांमध्ये त्याच्याकडून करण्यात येत असलेल्या सैनिकी कारवायांमुळे युक्रेनियन नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्यासही अडथळे निर्माण झाले आहेत, असे वृत्त ‘बीबीसी’ने प्रकाशित केले आहे.
४. दुसरीकडे ब्रिटनचे सुरक्षा सचिव बेन वॉलेस यांनी म्हटले आहे की, रशियाच्या सैनिकांना अपेक्षेपेक्षा अल्प यश मिळाल्याने ते हताश झाले आहेत.
५. रशियाचे उपपंतप्रधान यांनी चेतावणी दिली आहे की, जर युरोपकडून मॉस्कोवर अधिक प्रतिबंध लावण्यात आले, तर रशियाकडून युरोपला पुरवठा केल्या जाणार्या नैसर्गिक वायूवर बंदी लादण्यात येईल.
किती युक्रेनियन नागरिकांनी युरोपातील कोणत्या राष्ट्रात घेतला आश्रय ?
पोलंड : १२ लाख ४ सहस्र
हंगेरी : १ लाख ९१ सहस्र
स्लोवाकिया : १ लाख ४१ सहस्र
रशिया : ९९ सहस्र ३००
मोल्डोवा : ८३ सहस्र
रोमेनिया : ८२ सहस्र
बेलारूस : ४५३
वरील देशांमध्ये आश्रय घेतलेल्या १ लाख ८३ सहस्र युक्रेनियन नागरिकांनी नंतर युरोपमधील अन्य देशांमध्ये आश्रय घेतला आहे, अशी आकडेवारी संयुक्त राष्ट्रांनी प्रसारित केली आहे.