पुतिन यांना रोखले नाही, तर युरोप नष्ट होईल ! – युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की

  • युक्रेन आणि रशिया युद्धाचा १० वा दिवस

  • रशियाचे युक्रेनच्या राष्ट्रपती भवनावर आक्रमण

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की

कीव (युक्रेन) – युक्रेन आणि रशिया यांच्यामधील युद्धाच्या १० दिवशी रशियाने युक्रेनच्या राष्ट्रपती भगवाला लक्ष्य करत क्षेपणास्त्र डागले; मात्र ते भवनाच्या काही अंतरावर पडले. यावरून युक्रेनने ‘रशियाचा निशाणा पुन्हा एकदा चुकला’, असे म्हटले आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की म्हणाले की, पुतिन यांना रोखणे आवश्यक आहे, अन्यथा संपूर्ण युरोप नष्ट होईल.

१. युक्रेनने दावा केला आहे की, झायटोमिर शहरात रशियाच्या आक्रमणात ४७ नागरिक ठार झाले आहेत.

२. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, रशिया सतत सैनिकी तळांवर, तसेच नागरी भागांवर आक्रमण करत आहे. रशियाने युक्रेनच्या मारियुपोल शहरातील निवासी इमारतींवर क्षेपणास्त्रे डागली. घटनेच्या वेळी इमारतीत कुणीही नव्हते. रशियन सैन्याने युक्रेनची राजधानी कीवसह खारकीव आणि मारियुपोल या शहरांना वेढा घातला आहे. येथे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे अडकलेल्या नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

रशियाकडून फेसबूक आणि ट्विटरवर बंदी

रशियाने फेसबूक आणि ट्विटर या सामाजिक प्रसारमाध्यमांवर बंदी घातली आहे. यांवर प्रसिद्ध करण्यात येणार्‍या रशियाविरोधी मजकुरामुळे ही बंदी घालण्यात आली आहे. या दोघांच्या विरोधात २६ तक्रारी आल्या होत्या. दुसरीकडे फेसबूकने एक निवेदन प्रसिद्धीस देऊन म्हटले आहे की, रशियाच्या या निर्णयामुळे लाखो लोकांना विश्‍वसनीय माहिती मिळणार नाही.