भागलपूर (बिहार) येथे एका घरात झालेल्या स्फोटात १० जणांचा मृत्यू, तर ११ जण घायाळ

फटाके बनवतांना स्फोट झाल्याची प्रत्यक्षदर्शीची माहिती !

घटनास्थळ

भागलपूर (बिहार) – येथील काजवली चक परिसरात ३ मार्चच्या रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास एका घरात झालेल्या स्फोटात १० जण ठार, तर ११ जण गंभीरित्या घायाळ झाले आहेत. या प्रचंड मोठ्या स्फोटामुळे कोसळलेल्या ४ घरांच्या ढिगार्‍याखालून एका लहान मुलासह ३ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. ढिगार्‍यातून पोलिसांना ५ किलो फटाके आणि मोठ्या प्रमाणात लोखंडी खिळे सापडले आहेत. ढिगार्‍याखाली अजूनही अनेक लोक अडकले असून त्यांना बाहेर काढण्यात येत आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

१. नवीन मंडल आणि गणेश मंडल यांच्या घरांपैकी एका घरामध्ये हा स्फोट झाला; मात्र नेमका कोणत्या घरामध्ये झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ‘या घरांमध्ये फटाके बनवण्याचे काम चालते’, असे स्थानिकांनी सांगितले. नवीनच्या घरामध्ये यापूर्वी वर्ष २००२, २००८ आणि २०१८ मध्ये असेच स्फोट झाले होते.

२. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, ‘शब-ए-बारात’साठी (मुसलमानांचा एक सण) घरात फटाके बनवले जात होते, त्या वेळी हा स्फोट झाला. घायाळ असलेल्या निर्मल यानेही याला दुजोरा दिला आहे.

३. पोलीस उपअधीक्षक बाबूराम यांनी सांगितले की, पीडित कुटुंबातील एकजण फटाके बनवायचा. ज्याच्या घरात यापूर्वी स्फोटाची घटना घडली आहे. त्याच्याच घरात स्फोटक साहित्याचा स्फोट झाल्याचे दिसते. बाँब निकामी पथकाच्या तपासणीनंतर परिस्थिती स्पष्ट होईल.

भागलपूरच्या दोघांना काही दिवसांपूर्वीच स्फोटकांसह कोलकात्यात झाली होती  अटक !

कोलकाता पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच भागलपूरमधील दोघांना स्फोटकांसह अटक केली होती. त्यामुळे भागलपूरमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्तचर विभागाने भागलपूर पोलिसांना सतर्क केले होते. काही दिवसांपूर्वी भागलपूरमधील नाथनगर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनवर एक डिटोनेटर बाँब सापडला होता. यानंतर नाथनगर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळाच्या बाजूला झालेल्या बाँबस्फोटात एकाचा मृत्यू झाला.