सनातनची बालसाधिका कु. दिव्या जड्यार हिने पटकावला तृतीय क्रमांक !
रत्नागिरी, २० फेब्रुवारी (वार्ता.) – संस्कृत भारतीच्या रत्नागिरी शाखेकडून (कोकण प्रांत) आयोजित ‘संस्कृत सुभाषित पठण’ स्पर्धेमध्ये संगमेश्वर तालुक्यातील सरंद येथील सनातनची बालसाधिका कु. दिव्या दयानंद जड्यार हिने तृतीय क्रमांक पटकावला. यानिमित्त संस्कृत भारतीच्या वतीने प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन तिचा सत्कार करण्यात आला. कु. दिव्या ही माखजन इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता ६ वीमध्ये शिक्षण घेत आहे. १३ फेब्रुवारी २०२२ या दिवशी रत्नागिरी शहरातील सौ. गोदुताई जांभेकर विद्यालयात हा सत्कार सोहळा पार पडला. कु. दिव्या हिची मोठी बहीण कु. देवश्री (इयत्ता ८ वी) हिनेही या स्पर्धेत भाग घेतला होता. तिलाही प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. गोदुताई जांभेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अनिल चव्हाण, संस्कृत भारतीचे कोकण प्रांताचे शिक्षण सहप्रमुख श्री. आशिष आठवले, नगर संयोजिका अक्षया भागवत यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. २३ जानेवारी या दिवशी ‘ऑनलाईन’ पद्धतीने ही स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांतील ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला, तर सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले.
बुद्धी, प्रज्ञा आणि मेधा यांची वृद्धी होण्याकरता संस्कृत महत्त्वाचे !- विजय वाडीये, संस्कृतप्रेमी
संस्कृत सुभाषितांमुळे माणसाला आनंद मिळतो. मनाला प्रसन्नता लाभते. बुद्धी, प्रज्ञा, मेधा यांची वृद्धी होण्याकरता संस्कृत महत्त्वाचे आहे. संस्कृत सुभाषित पठण स्पर्धेमुळे सत्त्व आणि स्वत्व जागृत होते. पाल्यांवर संस्कार होण्यासाठी पालकांनी जागरूक रहायला हवे.
सुभाषितांमुळे वातावरणात प्रसन्नता निर्माण होते ! – कु. अनिशा आंबेकर, प्रथम क्रमांक विजेती
अर्थ समजून घेऊन सुभाषितांचे पाठांतर केल्यामुळे त्यांचा व्यावहारिक जीवनाशी संबंध आहे आणि त्यानुसार आचरण केले पाहिजे, हे जाणवले. सुभाषितांमुळे वातावरणात प्रसन्नता निर्माण होते, मन उत्साही होते. संस्कृतपठणाने वाणी शुद्ध होते. उच्चार स्पष्ट होतात.
या वेळी सौ. गोदुताई जांभेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अनिल चव्हाण यांनी संस्कृत ही चैतन्याने ओतप्रोत भरलेली भाषा आहे. संस्कृतचा जीवनावर सकारात्मक परिणाम होत असतो, असे मनोगत व्यक्त केले. स्पर्धेच्या परीक्षक वैशाली हळबे यांनी संस्कृत ही केवळ एका समाजाची भाषा नव्हे, तर सर्वांची भाषा असल्याचे नमूद करत संस्कृत भारतीच्या उपक्रमाचे कौतुक केले.
परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे यश मिळाले ! – कु. दिव्या जड्यारकु. दिव्या आणि कु. देवश्री या दोघीही सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतात. या यशाविषयी मनोगत व्यक्त करतांना कु. दिव्या म्हणाली, ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे मला यश मिळाले. पारितोषिक मिळाले तेव्हा मी श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. सुभाषित पाठ करतांना मी श्रीकृष्णाला प्रार्थना केली आणि श्रीकृष्णाने ती पाठ करून घेतल्याविषयी कृतज्ञताही व्यक्त केली. मी नियमितपणे सनातनचे बालसंस्कारवर्ग ऐकते. त्यामुळे संस्कृत विषय नसतांनाही पाठांतराला मला अडचण आली नाही. माझ्या शाळेतील संस्कृतचे शिक्षक श्री. जगदीश जाधव यांनीही माझ्याकडून उच्चारांचा सराव करवून घेतला. |