शिक्षक पात्रता परीक्षा अपव्यवहार प्रकरण
पुणे – शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) वर्ष २०१८ च्या परीक्षेतील अपव्यवहार प्रकरणात मुकुंदा सूर्यवंशी या आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या आरोपीने ऑक्टोबर २०१८ मध्ये परीक्षार्थींची सूची ‘पेनड्राईव्ह’मध्ये दिली होती आणि परीक्षार्थींकडून घेतलेल्या ८० लाख रुपयांची रोख रक्कम दलाल संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांना आणून दिल्याचे अन्वेषणात निष्पन्न झाले असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
ज्या परीक्षार्थींची सूची ‘पेनड्राईव्ह’मध्ये दिली, ते परीक्षार्थी नक्की कोणते आहेत ? त्यांची नावे अटक केलेल्या आरोपींकडून प्राप्त करायची आहेत, तसेच टीईटी २०१८ च्या परीक्षेमध्ये गुण वाढवण्यासाठी परीक्षार्थी कोणाच्या वतीने आरोपींच्या संपर्कात आले आहेत ? त्यांनी कोणाच्या वतीने सूर्यवंशी यांना पैसे दिले ? एकूण किती पैसे दिले आहेत ? याविषयी सखोल अन्वेषण करणे आवश्यक आहे, असा युक्तिवाद सरकारी अधिवक्ता विजयसिंह जाधव यांनी न्यायालयात केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीला २१ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.