(म्हणे) ‘सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांसारख्या कट्टर संस्था समाजासाठी घातक !’

डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी प्रतिज्ञापत्रात केंद्रीय अन्वेषण विभागाकडून उल्लेख

मुंबई – सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांसारख्या कट्टर संस्था या समाजासाठी घातक आहेत. हिंदुविरोधी विचारसरणीच्या लोकांना हे कट्टरतावादी शत्रूसमान मानतात आणि त्यांना नष्ट करणे, हाच त्यावरचा उपाय मानतात. कट्टरतावादी लोकांना विरोध केल्याच्या कारणामुळेच डॉ. दाभोलकर यांची हत्या घडवण्यात आली, असा फुकाचा दावा सीबीआयने मुंबई उच्च न्यायालयात केला. डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी चालू असलेल्या खटल्यात डॉ. वीरेंद्र तावडे यांच्या मुंबई उच्च न्यायालयात केलेल्या जामीन अर्जाला विरोध करतांना सीबीआयने वरील उल्लेख केला. या वेळी सीबीआयने प्रतिज्ञापत्र सादर केले. ‘डॉ. तावडे हे समाजात तणाव निर्माण करणार्‍या कट्टर संस्थांसाठी काम करतात, त्यामुळे त्यांना जामीन संमत केल्यास समाजात तणाव निर्माण होऊन समाजातील एकात्मतेला धोका पोचू शकेल’, असेही सीबीआयने यात म्हटले आहे.

१. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी डॉ. वीरेंद्र तावडे यांना केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने वर्ष २०१६ मध्ये अटक केली होती. डॉ. तावडे यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी लवकरच मुंबई उच्च न्यायालयात चालू होणार आहे.

२. केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे, ‘‘तावडे यांनीच दाभोलकर हत्येचा कट रचला आणि हत्येसाठी सुपारी दिली. तावडे समाजासाठी धोकादायक आहेत. गोवा बाँबस्फोट प्रकरणातील फरार आरोपी सारंग अकोलकर यांनी वीरेंद्रसिंह तावडे यांना ई-मेल करून सनातन संस्थेच्या कामासाठी उत्तरप्रदेश आणि आसाम येथून गावठी हत्यार मिळवून १५ सहस्र लोकांची सेना उभी करण्यास सांगितले होते.

पुन्हा एकदा ‘मिडिया ट्रायल’चा प्रयत्न ! – सनातन संस्था

(‘मिडिया ट्रायल’ म्हणजे प्रसारमाध्यामांनी न्यायाधिशाच्या भूमिकेत जाऊन एखाद्याच्या विरोधात वातावरण निर्मिती करणे)

श्री. चेतन राजहंस

मुंबई – डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणामध्ये दीड मासांपूर्वी सीबीआयने सीबीआय न्यायालयामध्ये डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना जामीन नाकारण्याच्या संदर्भात लेखी जबाब नोंदवला होता. या जबाबामध्ये ‘सनातन संस्थेसारख्या संघटना या समाजविघातक आहेत’, अशा प्रकारचे धक्कादायक विधान होते. हे विधान ‘लीक’ करण्यात आले आहे. या माध्यमातून सनातन संस्थेच्या विरोधात पुन्हा एकदा ‘मिडिया ट्रायल’ करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. कोणतेही प्रकरण न्यायप्रविष्ट असतांना उभय पक्ष युक्तीवाद करत असतात. न्यायालयाकडून निकाल घोषित केल्यानंतरच दोन्ही पक्षांनी केलेल्या युक्तीवादांची सत्यता निश्चित होत असते. सीबीआयने आतापर्यंत केलेले युक्तीवाद आजपर्यंत किती प्रमाणात सत्य ठरलेले आहेत, हा चर्चेचा विषय आहे’, अशी प्रतिक्रिया सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी व्यक्त केली.

श्री. राजहंस पुढे म्हणाले की,

१. सनातन संस्थेवर लाखो लोकांची श्रद्धा आहे. ज्या संस्थेने समाजोपयोगी कार्य केले, अनेक लोकांना तणावमुक्त अन् व्यसनमुक्त केले, अशी संस्था समाजविघातक कशी असू शकेल ? याचा सर्वांनी विचार करणे आवश्यक आहे.

२. समाजविघातक कार्य कोण करते ? हे शोधण्याचे काम सीबीआयचे आहे. त्या दिशेने तिने चांगले कार्य करावे.