आज वसंतपंचमी (५.२.२०२२) या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांचा प्रकटदिन आहे. त्या निमित्ताने…
प.पू. भक्तराज महाराज यांचे उत्तराधिकारी प.पू. रामानंद महाराज यांनी ‘प.पू. भक्तराज महाराज यांनी भजनांतून गुरूंचे महत्त्व सांगणे, गुरूंप्रती दृढ विश्वास असणे’ आदींच्या माध्यमातून गुरूंची महानता वर्णिली आहे.
१. अर्पण
‘माझ्या अल्पशा मानवी जीवनात पूर्वपुण्याईने आणि आई-वडिलांच्या कृपाशीर्वादाने, ‘साक्षात्कारी संत-महंत यांचा सत्संग लाभणे’, हे महद्भाग्य आहे.
२. खरा सत्संग
‘साधुसंत येती घरा । तोचि दिवाळी दसरा ।।’ म्हणजे ‘घरी साधुसंत येतील, तोच खरा दिवाळी आणि दसरा !’, असा अखंड आनंदाचा सण ज्या विभूतींच्या सहवासात सहजपणे साजरा होतो, तो खरा सत्संग !
३. ‘गुरुचरणी ठेवी ध्यास । तोची पुरवी तुझी आस ।।’, याची अनुभूती घेणारे प.पू. भक्तराज महाराज
‘गुरुचरणी ठेवी ध्यास । तोची पुरवी तुझी आस ।।’ ही भजनाची ओळ प.पू. भक्तराज महाराज यांनी लिहिलेल्या भजनात आहे. त्यांनी या ओळीतच सर्व सांगितले आहे. त्यांनी नुसते सांगितलेच नाही, तर त्यांनी ते स्वतः अनुभवले आहे. ‘आधी केले, मग सांगितले’ या उक्तीप्रमाणे त्यांनी प्रथम तसे केले आहे आणि नंतर सर्वांसाठी मार्गदर्शन केले.
गुरूंवर विश्वास ठेवून समर्पणभावाने वागणे फार कठीण आहे. त्यांची गुरूंवर पूर्ण श्रद्धा होती. त्यांना कितीही कष्ट झाले, तरीही त्यांनी मनात कोणताही विकल्प न आणता सर्व सहन केले.
४. गुरूंप्रती दृढ विश्वास असणे
‘गुरुविण दुजा ना दिसे । सामर्थ्य अंगी जे ऐसे ।।’ या प.पू. भक्तराज यांच्या भजनातील ओळीप्रमाणे त्यांच्यामध्ये ‘गुरूंमध्ये जे सामर्थ्य आहे, ते परमेश्वरातही नाही’, इतका दृढ विश्वास असणे, हे सामान्य माणसाचे कार्य नाही.
५. प.पू. भक्तराज महाराज यांचे गुरूंपाशी मागणे
गुरूंपाशी काही मागितले असेल, तर प.पू. भक्तराज महाराज यांनी काय मागितले ? ‘दुःखाहूनी दुःख । नाम विसरीता । देई मज बापा । सर्वकाळ ।।’ सर्व जण सुखाची अपेक्षा करतात; परंतु प.पू. भक्तराज महाराज यांनी ‘जर तुझे नाम विसरलो, तर मला दुःखच दे’, हे मागणे मागितले. ते सोपे नाही. आपल्यासारख्या माणसाला थोडे जरी दुःख झाले, तर आपण ते सहन करू शकत नाही आणि सुखाची अपेक्षा करतो.
६. गुरूंचे माहात्म्य
त्यांची रहाणी अगदी साधी होती. त्यांना पाहिल्यावर कुणीही ‘त्यांना संत किंवा महात्मा म्हणू शकणार नाही’, असा त्यांचा वेश होता. एका भजनात त्यांनी लिहिले आहे, ‘अमोल चीज जो दी गुरुने । न दे सके भगवान भी ।।’ ‘गुरु काय देऊ शकतात ?’, ते त्यांनी प्रत्यक्ष दाखवून दिले.
७. प.पू. भक्तराज महाराज यांनी अहर्निश गुरूंची सेवा करून सर्व प्राप्त केलेले असणे
परमेश्वर रागावला, तर त्याला गुरुमहाराजांच्या कृपेने प्रसन्न करता येईल; परंतु गुरु रागावले, तर त्यांना परमेश्वरही प्रसन्न करू शकत नाही; म्हणून प.पू. भक्तराज महाराज यांनी अहर्निश गुरूंची सेवा करून सर्व प्राप्त करून घेतले. त्यांनी कधीही स्वतःची प्रसिद्धी होऊ दिली नाही. त्यांनी गुरुकृपेने लिहिलेली भजने प्रासादिक असून स्व-अनुभवाची आहेत. ‘ज्यांना भाषा कळत नाही, तेही या भजनात रंगून जातात’, हा प्रत्यक्ष अनुभव आहे. ही भजने रामायण आणि महाभारत सर्वकाही आहे.’
– रामानंद (प.पू. रामानंद महाराज), भक्तवात्सल्य आश्रम, इंदूर. (संदर्भ : गुरुचरणी ठेवी ध्यास)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |