‘लिट्टे’साठी पैसे गोळा करण्याचा प्रयत्न करणार्‍या महिलेला अटक

चेन्नई (तमिळनाडू) – चेन्नई विमानतळावर पोलिसांनी मेरी फ्रान्सिस्को नावाच्या ५१ वर्षीय महिलेला अटक केली आहे. ही महिला श्रीलंकेची रहिवासी असून अनेक वर्षांपूर्वी ती कॅनडामध्ये स्थायिक झाली आहे. ही महिला मुंबईकडे जाणार्‍या विमानात बसण्याच्या सिद्धतेत असतांनाच पोलिसांनी तिला अटक केली. या महिलेकडे बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने बनवण्यात आलेले भारतीय पारपत्र सापडले आहे. ही महिला श्रीलंकेतील तमिळी हिंदूंसाठी लढणार्‍या ‘लिबरेशन टायगर ऑफ तमिल ईलम्’साठी (लिट्टेसाठी) काम करत असल्याचे चौकशीतून उघड झाले आहे. या घटनेतून लिट्टे पुन्हा सक्रीय होत असल्याचे निदर्शनास आले आहे. वर्ष २००९ मध्ये श्रीलंकेच्या सैन्याने लिट्टेचा प्रमुख प्रभाकरन् याला ठार करून लिट्टेला संपवले होते.

१. या महिलेने दिलेल्या माहितीनुसार देशभरातील बँकांमध्ये कुणीही दावा न केल्यामुळे पडून असलेला पैसा या लोकांच्या निशाण्यावर होता. जर्मनी आणि स्वीत्झर्लंड येथे रहाणार्‍या लिट्टेच्या दोन हितचिंतकांकडून हा पैसा हस्तगत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. हे दोघे कॅनडा, सिंगापूर आणि मलेशिया या देशांमध्ये रहाणार्‍या लिट्टेच्या इतर हितचिंतकांच्या गटाचे सदस्य आहेत. बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने हा पैसा काढून भारत आणि विदेशातील निरनिराळ्या बँक खात्यांमध्ये हा पैसा वर्ग करण्यासाठी या गटाकडून काम केले जाते. संघटनेच्या कामासाठी हा पैसा वापरण्याची त्यांची योजना होती.

२. फ्रान्सिस्को हिच्यावर मुंबईतील फोर्ट परिसरात असलेल्या इंडियन ओव्हरसीज बँकेच्या एका संयुक्त खात्यामधून कोट्यवधी रुपये काढण्याचे दायित्व सोपवण्यात आले होते. त्यासाठीच ती मुंबईला निघाली होती. डेन्मार्क आणि स्वीत्झर्लंड येथे रहाणार्‍या तिच्या दोघा साथीदारांच्या सांगण्यावरूनच ती मुंबईला निघाली होती. हा पैसा लिट्टेसाठी वापरला जाणार होता, असे तिने पोलिसांना सांगितले आहे.