नाट्यगृह चालवू शकत नसाल, तर आयुक्तांनी आसंदी खाली करावी ! – मनसेची मागणी

संभाजीनगर येथील संत एकनाथ रंगमंदिराच्या खासगीकरणावरून मनसे आक्रमक !

संभाजीनगर – शहरातील संत एकनाथ रंगमंदिराच्या खासगीकरणाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. २४ जानेवारी या दिवशी एकनाथ रंगमंदिर नाट्यगृहासमोर मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. महानगरपालिकेने या नाट्यगृहाच्या खासगीकरणाचा प्रस्ताव ठेवला असून प्रारंभीपासूनच मनसेने याला विरोध केला आहे; मात्र महापालिकाही स्वतःच्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे मनसेच्या वतीने पुन्हा एकदा निदर्शने करण्यात आली.

काय आहे मनसेची भूमिका ?

गेल्या काही वर्षांपासून नूतनीकरण करण्याच्या प्रक्रियेसाठी हे नाट्यगृह बंद आहे. गेल्यावर्षी याचे नूतनीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले असून यासाठी अनुमाने १० कोटी रुपये व्यय करण्यात आले. एवढा व्यय झाल्यानंतर आता महापालिकेने हे नाट्यगृह खासगी कंत्राटदाराला चालवण्यासाठी देण्याची प्रक्रिया चालू केली आहे. खासगीकरण करायचे होते, तर जनतेच्या १० कोटी रुपयांचा निधी त्यासाठी का वापरला ? असा प्रश्न मनसेने उपस्थित केला आहे.

महापालिका अत्यंत उत्तमरितीने नाट्यगृह चालवू शकते ! – सुमित खांबेकर, शहराध्यक्ष, मनसे

मनसेचे शहराध्यक्ष सुमित खांबेकर म्हणाले की, संत एकनाथ रंगमंदिराचे खासगीकरण करण्याचा निर्णय फक्त शिवसेनेच्या दबावाखाली घेण्यात आला आहे. महापालिका अत्यंत उत्तमरितीने हे नाट्यगृह कसे चालवू शकते, याचे नियोजनही आम्ही सूचवले आहे. तरीही महापालिका जर रंगमंदिर चालवू शकत नसेल, तर आयुक्तांनी आसंदी खाली करावी. अशा मनमानी करणार्‍या अधिकार्‍यांच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरलो असून खासगीकरणाला आमचा विरोध रहाणार आहे.