मुंबई – ३० कोटी रुपयांचे कागदोपत्री बनावट व्यवहार दाखवून ५ कोटी ५० सहस्र रुपयांच्या वस्तू आणि सेवाकराचा (जी.एस्.टी.) अपहार केल्याप्रकरणी भिवंडीतून मुन्नवर खान या व्यावसायिकाला अटक करण्यात आली आहे. खान गेल्या साडेतीन वर्षांपासून अपहार करत होता.खान याने श्री श्याम स्टील ट्रेडर्स या अस्तित्वात नसलेल्या आस्थापनाच्या वतीने भिवंडीतील आदर्श स्क्रॅप ट्रेडर्स या आस्थापनाचे बनावट व्यवहार दाखवून जी.एस्.टी. परतावा घेतल्याची गुप्त माहिती वस्तू आणि सेवाकर अधीक्षकांना मिळाली होती. या प्रकरणाच्या पडताळणीत त्याच्या आस्थापनाने व्यवहार केलेली १३ आस्थापने अस्तित्वातच नसल्याचे आढळले. खान याने १३ आस्थापनांसह ३० कोटी ६८ लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचे बनावट कागदपत्राद्वारे दाखवले.