सदैव जनतेच्या पाठीशी उभा रहाणारा उत्कृष्ट नेता म्हणून बाळासाहेब ठाकरे कायम स्मरणात रहातील ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आदरांजली

डावीकडून पंतप्रधान मोदी आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे

नवी देहली – ‘स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. सदैव जनतेच्या पाठीशी उभा रहाणारा उत्कृष्ट नेता म्हणून बाळासाहेब कायम स्मरणात रहातील’, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंतीमिमित्त ट्वीट करून त्यांच्या भावना व्यक्त करत आदरांजली वाहिली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. गुजरातमध्ये दंगली उसळल्या, तेव्हा मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्या वेळी मोदी यांना  हटवण्याची सिद्धता पक्षनेतृत्वाने केली होती. त्या वेळी बाळासाहेब ठाकरे हे मोदी यांच्या पाठीशी उभे राहिले होते. ‘मोदी यांना हटवले, तर गुजरात हातचे जाईल’, असे त्यांनी भाजपच्या नेतृत्वाला सांगितले होते. मोदी यांनीही नेहमीच बाळासाहेब ठाकरे यांचा आदर केला.

नीडर नेत्याला माझे नमन ! – राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री

राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री

‘देशातील सर्वांत नीडर नेत्यांपैकी बाळासाहेब एक होते. जयंतीनिमित्त मी त्यांचे स्मरण करतो आणि त्यांना नमन करतो. राष्ट्र आणि समाज यांच्या हिताच्या सूत्रांंवर त्यांनी नेहमीच सडेतोड भूमिका मांडली. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली’, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना उजाळा दिला. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आदींनीही बाळासाहेबांना आदरांजली वाहिली.