पौष कृष्ण पक्ष षष्ठी (२४.१.२०२२) या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणार्या सौ. अक्षता रूपेश रेडकर यांचा ३३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची आई आणि बहीण यांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये अन् त्यांच्यात जाणवलेला पालट येथे दिला आहे.
सौ. अक्षता रूपेश रेडकर यांना ३३ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
सौ. सुजाता अशोक रेणके (सौ. अक्षताची आई), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१. गुणवैशिष्ट्ये
१ अ. मिळूनमिसळून रहाणे : ‘सौ. अक्षता आमच्याकडे असो किंवा सासरी असो, ती सर्वांच्या समवेत मिळूनमिसळून रहाते.
१ आ. शिकण्याची आणि समाधानी वृत्ती : समाजातील काही लोकांच्या अडचणी पाहिल्यावर ती म्हणते, ‘‘मला काहीच अडचण नाही. गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) मला सर्वांगांनी सुख आणि समाधान दिले आहे. मीच शिकायला अल्प पडते.’’
२. जाणवलेले पालट
२ अ. ‘स्वतःतील स्वभावदोषांमुळे त्रास होतो’, हे लक्षात घेऊन अक्षता आता स्वभावदोष आणि अहं यांवर मात करून प्रसंगांत स्थिर रहाते.
२ आ. आता ती कौटुंबिक अडचणी सोडवण्यासाठी आणि सतत आनंदी रहाण्यासाठी प्रयत्न करते.
२ इ. अनेक वैद्यांकडून शिकायला मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग साधकांसाठी करण्याचा विचार करणे : तिच्यात आता व्यापकत्व येत आहे. ती ‘फिजिओथेरपीस्ट’ (भौतिकोपचार तज्ञ) आहे. त्या क्षेत्रात परिपूर्ण होण्यासाठी तिला अनेक वैद्यांकडे सरावासाठी जाण्याची संधी मिळाली. ‘गुरुदेव त्या वैद्यांच्या माध्यमातून मला जे शिकवत आहेत, त्या ज्ञानाचा उपयोग मला साधकांसाठी करायचा आहे’, असा विचार करून ती आश्रमातील वयस्कर साधक आणि शारीरिक त्रास असणारे साधक यांच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न करते. ती इतरांचा विचार करून उपचार करते.
‘मी शरिराने नाजूक असले, तरी मनाने खंबीर आणि आनंदी असेन, तर देव मला आत्मबळ देतो’, याची मला अनेक वेळा अनुभूती आली आहे’, असे ती म्हणते.
२ ई. दायित्व घेऊन आत्मविश्वासाने सेवा करणे : पूर्वी तिचा स्वभाव भित्रा असल्यामुळे एखादी गोष्ट तिच्या मनाविरुद्ध घडल्यास तिला पुष्कळ ताण यायचा. आता तिचा आत्मविश्वास वाढला आहे. आता ती सेवेचे दायित्व घेते आणि सेवा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करते.
२ उ. ती व्यष्टी साधनेची घडी बसवण्याचाही गांभीर्याने आणि चिकाटीने प्रयत्न करते.
३. संतांची लाभलेली प्रीती
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी तिला आईचे प्रेम दिले. त्यामुळे तिला सेवा करण्यासाठी आणि व्यष्टी साधनेची घडी बसवण्यासाठी आध्यात्मिक बळ मिळाले.’
सौ. दीपा औंधकर (सौ. अक्षताची मोठी बहीण), रत्नागिरी
१. बहिणीला साधनेत साहाय्य करणे : ‘अक्षता माझ्यापेक्षा वयाने लहान असली, तरी ती मला नेहमी साधनेचे योग्य दृष्टीकोन देते. मला काही अडचण आल्यास मी तिच्याशी मोकळेपणाने बोलू शकते.
२. स्वतःला पालटण्याची तळमळ : अक्षतामध्ये पुष्कळ पालट जाणवतो. आधी ती लहान सहान गोष्टींवरून चिडायची. आता ती प्रसंगांमध्ये न अडकता साधना होण्याकडे अधिक लक्ष देते.
अक्षतामध्ये ‘काटकसरीपणा, अभ्यासू आणि समाधानी वृत्ती, परिश्रम करण्याची सिद्धता आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती दृढ श्रद्धा’, असे अनेक गुण आहेत. त्यामुळे तिला आश्रमजीवन सहजतेने स्वीकारता आले.’ (२५.१२.२०२१)