सीमा सुरक्षा दलाचे अधिकारी प्रवीण यादव यांची कोट्यवधींची संपत्ती पोलिसांनी घेतली कह्यात !

महागड्या आस्थापनांच्या ७ गाड्या आणि १४ कोटी रोख रक्कम, १ कोटी रुपयांचे दागिने कह्यात

  • सीमा सुरक्षा दलाचा अधिकारी एवढी संपत्ती जमा करेपर्यंत पोलीस आणि प्रशासन झोपले होते का ? कि पोलीस आणि प्रशासन यांना ठाऊक असूनही त्यांनी वेळीच कारवाई का केली नाही ? सीमा सुरक्षा दलालाही याची माहिती कशी मिळाली नाही ? – संपादक
  • देशाच्या सुरक्षाव्यवस्थेतील भ्रष्ट अधिकार्‍यांना तात्काळ कठोरातील कठोर शिक्षा झाली, तरच अशा अपप्रकारांना आळा बसेल ! – संपादक
अटक झालेले सीमा सुरक्षा दलाचे अधिकारी प्रवीण यादव

गुरुग्राम (हरियाणा) – गुरुग्राम पोलिसांनी सीमा सुरक्षा दलाचे अधिकारी प्रवीण यादव यांच्या घरावर छापा घातला. या वेळी पोलिसांनी १४ कोटी रुपये रोख रक्कम, १ कोटी रुपयांचे दागिने, ‘मर्सिडीज’ आणि ‘बीएम्डब्ल्यू’ यांसारख्या महागड्या आस्थापनांची ७ वाहने आदी संपत्ती कह्यात घेतली आहे. यादव हे हरियाणा सीमा सुरक्षा दलाच्या गुरुग्राम येथील मानेसरमधील ‘राष्ट्र्रीय सुरक्षा रक्षक (एन्.एस्.जी.)’ मुख्यालयात ‘डेप्युटी कमांडंट’ म्हणून काम करत होते. हरियाणा पोलिसांनी प्रवीण यादवसह त्यांची पत्नी ममता यादव, बहीण रितू आणि एक सहकारी यांनाही अटक केली आहे.

१. गुरुग्राम पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे साहाय्यक पोलीस आयुक्त प्रीतपाल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार यादव यांनी ‘आय.पी.एस्.’ अधिकारी असल्याचे भासवून लोकांची फसवणूक करत १२५ कोटी रुपयांची मालमत्ता जमवली होती. तसेच त्यांनी लोकांना राष्ट्रीय सुरक्षा रक्षक मुख्यालयाच्या परिसरात बांधकामाचे कंत्राट मिळवून देण्याचे खोटे आश्‍वासन देत त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये घेतले होते.

२. यादव यांनी हे सर्व पैसे राष्ट्रीय सुरक्षा रक्षक मुख्यालयाच्या नावे चालू केलेल्या खोट्या खात्यात जमा केले होते. हे खाते त्यांची बहीण रितू यादव यांनी उघडले होते. रितू यादव या अ‍ॅक्सिस अधिकोषात व्यवस्थापक म्हणून काम करतात.

३. प्रवीण यादव यांना शेअर बाजारात ६० लाख रुपयांची हानी झाल्यावर हे पैसे पुन्हा मिळवण्यासाठी त्यांनी लोकांची फसवणूक करत हा सगळा पैसा मिळवण्याचा कट आखला होता.

४. प्रवीण यादव यांना अगरताला येथे स्थानांतर (बदली) मिळाले होते; परंतु काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यागपत्र दिले होते.