लातूर येथे ‘नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ या चित्रपटाचा खेळ ‘भारतीय स्त्री शक्ती’ संघटनेकडून बंद !

अश्लील चित्रपट पोलिसांऐवजी स्त्री शक्ती संघटनांना बंद पाडावा लागणे दुर्दैवी ! – संपादक

लातूर – महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शन केलेला ‘नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ हा मराठी चित्रपट १४ जानेवारी या दिवशी ‘भारतीय स्त्री शक्ती’ आणि आय.एम्.ए.च्या कार्यकर्त्यांनी येथे बंद पाडला. भारतीय स्त्री शक्ती या संघटनेने मुंबई, नागपूर, लातूर, पुणे अशा विविध ठिकाणी या चित्रपटाच्या विरोधात लेखी तक्रार पोलीस ठाण्यांमध्ये दिली आहे. येथील ‘पी.व्ही.आर्.’ आणि ‘यशोदा चित्रपटगृह’ या दोन ठिकाणी चित्रपट प्रदर्शित होणार होता. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन करत दोन्ही ठिकाणी ४ महिलांनी चित्रपट बंद पाडण्यास भाग पाडले. (गुन्हेगारी आणि व्यभिचार यांना प्रोत्साहन देणार्‍या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्याची वेळ महिला संघटनांवर का येते ? सेन्सॉर बोर्ड आणि पोलीस प्रशासन यांच्या हे लक्षात येत नाही का ? – संपादक)

१. महेश मांजरेकर यांनी ‘हा चित्रपट प्रौढांसाठी आहे’, असे घोषित केले असले, तरी चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये याचा कुठेही उल्लेख नाही. या चित्रपटामध्ये अल्पवयीन मुलांचा अतिशय बीभत्सपणे वापर करण्यात आला असून विकृत, हिंसाचार वाढवणारी आणि अश्लीलतेचा कळस गाठणारी दृष्ये चित्रपटात आहेत, त्यामुळे पोक्सोच्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्याची मागणीही भारतीय स्त्री शक्तीने केली आहे.

२. राष्ट्रीय महिला आयोग, राज्य महिला आयोग, बाल हक्क संरक्षण विभाग, अशा सर्व स्तरांवर या चित्रपटाच्या विरोधात तक्रारी करण्यात आल्या असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी, तसेच राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या प्रमुख प्रियंका कांगो यांनीही मांजरेकर यांना नोटीस पाठवली आहे.