अखिलेश यादव यांना झालेला स्वप्नदृष्टांत !

उत्तरप्रदेशची निवडणूक जवळ आल्याने हिंदुत्वाचा दु:स्वास करणार्‍या नेत्यांनाही आता देवाची आठवण होऊ लागली आहे. अनेक नेते मंदिरात जाऊन देवांचे दर्शन घेत आहेत, पूजा करत आहेत. काही नेत्यांमधील भक्ती ‘अचानक’ अशी जागृत झाली आहे की, आता प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण त्यांच्या स्वप्नात येऊ लागला आहे. या संदर्भात समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांचे सुपुत्र आणि उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव म्हणाले, ‘‘भगवान श्रीकृष्ण माझ्या स्वप्नात येतो. प्रतिदिन येतो आणि म्हणतो की, समाजवादी पक्षाचे सरकार स्थापन होणार आहे.’’ ‘गेल्या ५ वर्षांत अखिलेश यादव यांना कधीही स्वप्नदृष्टांत झाला नाही आणि अचानक निवडणुकीच्या तोंडावरच भगवान श्रीकृष्ण त्यांच्या स्वप्नात कसा आला ? ’, असा प्रश्न निश्चितच सामान्यांच्या मनात उपस्थित होत असणार !

(पू.) निवृत्त न्यायाधीश सुधाकर चपळगावकर

१. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सोयीस्कर मौन !

एखाद्या राजकीय विचारसरणीविषयी प्रेम असणे साहजिक आहे. डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या पक्षाचे नाव लावणार्‍याने ‘भगवान श्रीकृष्णाने स्वप्नात येऊन त्याच पक्षाचे सरकार स्थापन होणार आहे’, असे सांगणे आणि त्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मौन बाळगणे, यावरून ‘समितीने सामाजिक बांधिलकी काहीशी सैल केली असावी’, असे वाटते.

२. निवडणूक आयोग गप्प का ?

भारत हा धर्मनिरपेक्ष देश असून धर्माच्या आधारावर मत मागण्यास अनुमती नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना निवडणूक आयोगाने धर्माच्या आधारावर मते मागितल्याचा आरोप ठेवत मतदानाचा अधिकार ६ वर्षांसाठी काढून घेतला होता. त्या वेळी तत्परतेने नोंद घेणार्‍या केंद्रीय निवडणूक आयोगाने अखिलेश यादव यांच्या स्वप्नदृष्टांताविषयी का आक्षेप घेतला नाही ? हिंदूंचे आराध्य दैवत असणारा भगवान श्रीकृष्ण स्वप्नात येत असल्याचे सांगून अखिलेश यादव भोळ्या भाबड्या हिंदूंची मते वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. कुणाला मतदान करावे, हे श्रीकृष्ण त्याच्या भक्तांना सांगत नसेल का ? जसा श्रीकृष्ण अखिलेश यादव यांच्या स्वप्नात येऊ शकतो, तसेच तो भक्तांच्या स्वप्नातही येऊ शकतो आणि ‘कुणाला मत द्यायचे किंवा देऊ नये’, हे सांगू शकतो.

२ अ. एका कथित धर्मनेत्याला पडलेले स्वप्न आणि तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांनी त्याला ‘जशास तसे’ दिलेले उत्तर ! : मी शाळेत शिकत असतांना शहरात घडलेली एक घटना मला आठवत आहे. साधारणपणे वर्ष १९५६ च्या सुमारास बीडच्या जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यालयासमोर एक स्वयंघोषित धर्मनेते कार्यालयासमोरील लिंबाच्या झाडाखाली ठाण मांडून बसले आणि त्यांनी, ‘मला स्वप्न पडले आणि स्वप्नामध्ये बीडचे जिल्हाधिकारी मला काही देणगी देणार आहेत’, असे दिसले’, असे जाहीर केले. त्या वेळी जिल्हाधिकारी हे दौर्‍यावर होते. ‘तिसर्‍या दिवशी जिल्हाधिकारी आले आहेत’, हे कळताच गावातील खूप मोठी गर्दी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमा झाली होती. जिल्हाधिकारी जीपमधून उतरले आणि तेथे बसलेल्या तथाकथित धर्मानेत्याच्या सामोर गेले. त्यांनी त्या धर्मानेत्याला सांगितले, ‘तुम्हाला जसे स्वप्न पडले आहे, तसे मलाही स्वप्न पडल्यानंतर मी तेवढी रक्कम देण्याची व्यवस्था करतो; कारण शासनाचे नियम आम्हाला सांभाळावे लागतात.’ असे सांगून ते कार्यालयामध्ये निघून गेले. २ दिवसांनी त्या कथित धर्मनेत्याने तेथून आपला गाशा गुंडाळला.

याप्रमाणेच ‘कुणाला मत द्यावे’, असे जर परमेश्वर त्या मतदारांच्या स्वप्नात येऊन सांगत असेल, तर त्या मतदाराला जे योग्य वाटेल त्यानुसार करण्यास तो मुक्त नाही काय ? ‘परमेश्वरापेक्षा त्या मतदाराचा अंतरात्मा जो आदेश देईल त्या आदेशानुसार त्याने मतदान करावे’, असे त्या मतदाराला वाटले तर त्यात गैर काय आहे ? ‘कुणाला मत द्यावे ?’, याबद्दल प्रत्येक मतदाराचा अंतरात्मा कशाच्या आधारावर त्याला आदेश देत असेल ? गेल्या काही काळामध्ये त्याला आलेले अनुभव, हे जमेला धरून प्रत्येक मतदार ‘कुणाला मत द्यायचे’, हे ठरवत असतो, याबद्दल वाद असू नये.

३. कारसेवकांचे आत्मेही काही जणांच्या स्वप्नात येऊन न्याय मागत आहेत !

विशेषतः वर्ष १९९० च्या सुमाराला अयोध्येच्या आसपास जे काही घडले, तेथे जो काही बळाचा वापर करण्यात आला, त्यामुळे कारसेवकांना किंवा भक्तांना बळी जावे लागले. त्यांना त्रास झाला, पीडा झाली, त्यांच्या देहाची विटंबना झाली. अशा आलेल्या या सगळ्या बातम्या मतदारांपर्यंत निश्चितच पोचल्या असणार आणि त्या सगळ्यांना साक्षी ठेवून ‘कुणाला मत द्यावे’, हे मतदार ठरवत असतो.

एका जुन्या चित्रपटातील गीत या ठिकाणी उद्धृत करावेसे वाटते, बहुधा गीतकार साहिर लुधियानवी यांचे हे गीत असावे. स्वर्गात गेलेली आई आपल्या मुलाला सांगत आहे की, मेरी बरबादी के जामीन अगर आबाद रहे, मै तुझे दूध ना बक्षुंगी, तुझे याद रहे …’ यातील जामीन या शब्दाचा अर्थ ‘जबाबदार’ असा आहे. आता हे जे आत्मे आहेत, हे आत्मे या मतदारांना सांगत नसतील का की, माझ्या मृत्यूला जबाबदार आहेत, त्यांना तू मत देऊ नको. असे त्यांनी जर सांगितले, तर मतदारांनी त्या सांगण्याला का मान देऊ नये ? वर्ष १९९०-९१ किंवा १९९२ या काळामध्ये ज्या कारसेवकांना, ज्या भक्तांना या सगळ्या त्रासाला सामोरे जावे लागले, त्यांचे आत्मे हे सांगत आहेत की, मत कुणाला द्यावे. पुनर्जन्म हा कर्मसिद्धांताचा एक भाग आहे. कदाचित् वर्ष १९८९-९२ च्या काळात ज्या कारसेवकांना, भक्तांना मृत्यूला सामोरे जावे लागले त्यांनी पुनर्जन्मही घेतला असू शकेल.

मतदानाचा अधिकार हा आपल्या घटनेने दिलेला अधिकार आहे. तो कसा वापरावा ? याबद्दल मार्गदर्शन या प्रत्येक कारसेवकाचा आत्मा त्यांना निश्चित करत आहे आणि त्या काळात काय घडले आहे, याचा अनुभव प्रत्येक मतदार स्वतःच्या मनात ठेवणार आहे. यामुळे ‘कुणाला काय स्वप्न पडले आहे’ याला फारसे महत्त्व आहे, असे मला वाटत नाही.

– (पू.) निवृत्त न्यायाधीश सुधाकर चपळगावकर, संभाजीनगर