छगन भुजबळांच्या निर्दोष मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

देहली येथील महाराष्ट्र सदन

मुंबई – महाराष्ट्र सदन घोटाळ्याच्या प्रकरणी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्याच्या निर्णयाला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मुंबई सत्र न्यायालयाने भुजबळ यांची निर्दोष मुक्तता केली होती.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ

महाराष्ट्रात खळबळ उडवून देणार्‍या महाराष्ट्र सदन कथित घोटाळ्याप्रकरणी ९ सप्टेंबरला छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या न्यायालयाकडे दोषमुक्त करण्यासाठी भुजबळांनी अर्ज केला होता. त्यानंतर न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याला आव्हान द्यायला हवे होते; परंतु सध्या त्यांचे सरकार असल्याने हा विभाग आणि गृह मंत्रालय त्यांच्या अंतर्गत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून आव्हान देण्यात आले नाही. त्यामुळे नाईलाजाने मी आव्हान दिले; कारण एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून हे माझे कर्तव्य आहे, असे अंजली दमानिया यांनी सांगितले.