गंगानदीच्या घाटावर अहिंदूंना प्रवेश नसल्याची सूचना देणारे फलक तक्रार नसतांनाही पोलिसांनी काढले !

तक्रार नसतांनाही फलक काढण्याची ‘तत्परता’ दाखवणारे पोलीस हिंदूंनी तक्रार केल्यावर मात्र कारवाई करण्यास टाळाटाळ करतात, हे लक्षात घ्या ! उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना असे होणे हिंदूंना अपेक्षित नाही ! – संपादक

गंगानदीच्या घाटावर अहिंदूंना प्रवेश नसल्याची सूचना देणारे फलक

वाराणसी (उत्तरप्रदेश) – हिंदू नसणार्‍यांना वाराणसीतील गंगानदीच्या घाटांवर प्रवेश नसल्याची चेतावणी देणारे हिंदी भाषेतील फलक संपूर्ण शहरात झळकल्याचे समोर आले आहे. हे फलक विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्याकडून लावण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या फलकांवर या दोन्ही संस्थांची नावे लिहिण्यात आली आहेत. पोलिसांनी हे सर्व फलक हटवले आहेत. या प्रकरणी कुणाकडूनही तक्रार नोंदवण्यात आलेली नाही. फलक लावतांनाचे व्हिडिओ प्रसारित झाले असल्याने त्यांच्या आधारे ते लावणार्‍यांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

या फलकावर लिहिले आहे की, हिंदू नसणार्‍यांना प्रवेश नाही. गंगामाता, काशीचे घाट आणि मंदिर हे सनातन धर्म, भारतीय संस्कृती, श्रद्धा आणि आस्था यांचे प्रतीक आहेत. ज्यांची सनातन धर्मावर श्रद्धा आहे, त्यांचे इथे स्वागत आहे. अन्यथा हे ठिकाण पर्यटन स्थळ नाही. ही विनंती नसून चेतावणी आहे.

हिंदू नसलेल्या व्यक्ती काशीमधल्या घाटांचे पावित्र्य भंग करतात ! – बजरंग दल

बजरंग दलाचे काशीमधील व्यवस्थापक निखिल त्रिपाठी रुद्र यांनी पी.टी.आय. वृत्तसंस्थेशी बोलतांना सांगितले की, हिंदू नसलेल्या व्यक्ती काशीमधील घाटांचे पावित्र्य भंग करतात. त्यामुळेच ही चेतावणी त्यांना देण्यात आली आहे. सनातन धर्मावर श्रद्धा नसणार्‍यांना ही चेतावणी आहे. काही दिवसांपूर्वी घाटावर एका मुलीचे बीअर पितांनाचे छायाचित्र समोर आले होते. येथील घाट आणि मंदिरे सनातन धर्माची प्रतीके आहेत. जर अशी कोणती व्यक्ती घाटावर दिसली, तर आम्ही त्या व्यक्तीला पकडून पोलिसांच्या कह्यात देऊ. (हे कार्य पोलिसांचे आणि प्रशासनाचे असतांना ते अशा वेळी झोपलेले असतात का ? – संपादक)