ख्रिस्ती नववर्षानिमित्त आलेल्या पर्यटकांकडून समुद्रकिनार्‍यांवर कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे सर्रास उल्लंघन

म्हापसा, १ जानेवारी (वार्ता.) – गोव्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या दिवसागणिक झपाट्याने वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ख्रिस्ती नववर्षाच्या स्वागतासाठी कार्यक्रमाचे आयोजन करणारे (इव्हेंट ऑर्गनायझर), क्लब आणि रेस्टॉरंट यांचे मालक यांना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे कठोरेतेने पालन करण्याचा आदेश दिलेला असला, तरी या आदेशाचे उत्तर गोव्यातील समुद्रकिनार्‍यांवर ‘इलेक्ट्रॉनिक डान्स फेस्टीव्हल’चे (‘इडीएम्’चे) आयोजक, क्लब आणि रेस्टॉरंट यांचे मालक यांनी सर्रास उल्लंघन केले.

वर्ष २०२१चा मावळता सूर्य पहाण्यासाठी, तसेच ख्रिस्ती नववर्षाच्या स्वागतासाठी कळंगुट, वागतोर आदी समुद्रकिनारपट्टीवर सहस्रोंच्या संख्येने आणि एकदम दाटीवाटीने पर्यटक जमले होते. वागातोर येथील डोंगरावर उच्च दर्जाच्या रेस्टॉरंटमध्ये २३ ते ३१ डिसेंबर या कालावधीत ‘इडीएम्’चे (‘इलेक्ट्रॉनिक डान्स अँड म्युझिक’चे म्हणजे संगीत रजनीचे) आयोजन करण्यात आले आणि या ठिकाणी प्रतिदिन १० सहस्रांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती होती, तसेच कळंगुट, बागा आदी अनेक ठिकाणी मेजवान्यांचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे कुठेही कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केले गेले नाही. कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी असूनही आणखी नवीन लोकांना प्रवेश दिला जाता होता. कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेश करतांना ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ प्रमाणपत्रही विचारले जात नव्हते. प्रवेश करण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागत होती. गस्त घालणारे पोलीस केवळ वाहतुकीतील अडथळा दूर करण्यावर भर देत होते, तर कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कोणतीच कारवाई केली जात नव्हती. रात्री चालू झालेली संगीत रजनी नियमबाह्यरित्या सकाळी १० वाजेपर्यंत चालू ठेवण्यात आली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणार ध्वनीप्रदूषण होत होते. या घटनेवरून कळंगुटवासीय म्हणाले, ‘‘सरकारचे कोरोना प्रतिबंधात्मक नियम केवळ कागदोपत्रीच राहिले.’’