१ जानेवारी ते ३१ मे २०२२ या कालावधीत यांत्रिक नौकांद्वारे (पर्ससीनद्वारे) मासेमारी करण्यावर बंदी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्ससीनद्वारे मासेमारी करणारे व्यावसायिक मासेमारी बंदीच्या विरोधात १ जानेवारीपासून साखळी उपोषण करणार

मालवण – ५ फेब्रुवारी २०१६ च्या राज्यशासनाच्या अध्यादेशानुसार १ जानेवारी ते ३१ मे २०२२ या कालावधीत यांत्रिक नौकांद्वारे (पर्ससीन) मासेमारी करण्यावर बंदी घालण्यात येणार आहे. याच्या विरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्ससीनद्वारे मासेमारी करणारे व्यावसायिक आक्रमक झाले असून त्यांनी १ जानेवारी २०२२ या दिवशी सकाळी ११ वाजल्यापासून मालवण येथील साहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांच्या कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्ह्यातील पर्ससीन मासेमारी करणार्‍या मासेमारांनी २५ डिसेंबरला येथील साहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. या वेळी मासेमारांनी मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयातील अधिकारी तेजस्विनी करंगुटकर यांच्याशी चर्चा केली.

या वेळी अशोक सारंग यांनी ‘केवळ पर्ससीनद्वारे मासेमारी करणार्‍यांवर कारवाई केली जाते. ‘शासनाकडून पर्ससीनवरील बंदीविषयी आलेला सुधारित अध्यादेश मासेमारांना समजावून सांगा’, असे अधिकार्‍यांना सांगितले असता त्यांना ते शक्य झाले नाही. त्यामुळे जोपर्यंत अध्यादेशाचे विश्‍लेषण करून सांगितले जात नाही, तोपर्यंत आम्ही मासेमारी चालू ठेवणार, अशी चेतावणी दिली.