नवी देहली – देशात गेल्या काही दिवसांत गाढवांची संख्या झपाट्याने अल्प होत आहे, असे ‘ब्रुक इंडिया’ संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. वर्ष २०१२ आणि वर्ष २०१९ पशूगणना या कालावधीत भारतातील गाढवांच्या संख्येमध्ये एकूण ६१.२३ टक्के घट नोंदवली गेली आहे. हा अहवाल संस्थेने केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाला दिला आहे.
‘गाढवाचे मांस खाल्ल्याने आरोग्याला लाभ होतो’, असा समज असल्याने देशातील काही भागांमध्ये गाढवाच्या मांसाला मागणी आहे. या कारणामुळेही गाढवांची संख्या अल्प झाल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (‘एफ्.एस्.एस्.ए.आय.’च्या) सांगण्यानुसार गाढवाचे मांस हे खाण्यासाठी वापरू शकत नाही. गाढवाचे मांस खाणे कायद्यानुसार चुकीचे आहे.
आयुष्य आणि लैंगिक क्षमता वाढवणारे चिनी औषध बनवण्यासाठी गाढवाच्या कातड्याचा वापर !
‘ब्रुक इंडिया’ संस्थेचे सदस्य शरत वर्मा यांनी सांगितले की, गाढवांच्या संख्येत घट होण्याविषयीचा तपशील जाणण्यासाठी आम्ही गाढवांचे मालक, पशू व्यापारी, पशू मेळ्यांचे आयोजक, तसेच राज्य आणि केंद्रीय पशूसंवर्धन अधिकारी यांच्याशी बोललो. काही वर्षांपूर्वी चीनमधील एका व्यक्तीने प्रतिमास २०० गाढवे खरेदी करण्यासाठी व्यापार्यांशी संपर्क साधला होता. ‘गाढवाचे कातडे हवे’, असे त्यांनी सांगितले होते. जिवंत गाढवे, चामडे आणि मांस याची निर्यात अवैधरित्या होत आहे. भारतातच नव्हे, तर जगभरात गाढवांची संख्या अल्प होण्यासाठी चीनला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे उत्तरदारयी धरले जात आहे; कारण गाढवाच्या चामड्याचा वापर ‘इजियाओ’ हे पारंपरिक चिनी औषध बनवण्यासाठी केला जातो. इजियाओ हे आयुष्य आणि लैंगिक क्षमता वाढवते, तसेच इतर आजार बरे करण्यासाठी उपयुक्त असल्याचा समज आहे.