‘नदी महोत्सवा’तून कृती अपेक्षित !

‘नदी महोत्सव’

नाशिक येथे १५ ते २१ डिसेंबर या कालावधीत ‘नदी महोत्सवा’चे आयोजन केले आहे. या महोत्सवामध्ये गोदावरी नदीच्या इतिहासासह आजूबाजूच्या परिसराची माहिती सांगणारी ‘वारसा फेरी’ काढण्यात येणार आहे, तसेच विविध व्याख्यानांच्या माध्यमातून ‘नदी संस्कृती’ समाजासमोर मांडण्यात येणार आहे. या महोत्सवामुळे नाशिककरांसह अनेक लोकांपर्यंत गोदावरी नदीचे माहात्म्य पोचेल, हे निश्चित ! त्यामुळे या उपक्रमाचे आयोजन केल्याविषयी आयोजकांचे कौतुकच आहे; मात्र यादृष्टीने चांगल्या वाईट गोष्टींकडेही लक्ष गेल्याविना रहात नाही.

गोदावरी नदी

गोदावरी नदीला भारतातील ७ प्रमुख नद्यांतील १ प्रमुख नदी मानले जाते. प्रभु श्रीरामचंद्रांनी निवास केल्याने गोदावरी नदीला अधिकच महत्त्व आणि पावित्र्य प्राप्त झाले आहे. गोदावरीच्या काठी त्र्यंबकेश्वर, नाशिक, नेवासे, पैठण, भालचंद्रम्, राजमहेंद्री आणि कोटीपल्ली ही प्रमुख तीर्थक्षेत्रे आहेत. कुंभमेळ्यामुळे गोदावरी नदीला अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे. अशा महान गोदावरी नदीचे सध्याचे रूप पाहिल्यास ही महानता किती जणांना ठाऊक आहे ? असा प्रश्न पडतो. गोदावरी घाटामध्ये अनेक ठिकाणी कचरा अस्ताव्यस्त पडलेला असतो. गोदावरीच्या काठी अनेकांनी व्यवसायाच्या हेतूने दुकाने थाटली; परंतु तेथील धार्मिकता जपण्यासाठी व्यापारी, प्रशासन किंवा भाविक कुणीही पुढाकार घेतांना दिसत नाही. प्रशासन आणि भाविक यांची उदासीनता गोदावरी नदीच्या सात्त्विकतेला हानी पोचवत आहेत, याचे भान त्यांना नाही, तसेच गोदावरी काठावरील सर्व तीर्थक्षेत्रांचे आणि या स्थानांचे माहात्म्य सांगणारे फलक नाहीत. त्यामुळे नवीन पिढीच्या मनावर ‘गोदावरी नदी अस्वच्छ आहे’, हाच संस्कार होत आहे. त्यामुळे या स्थानांचे संवर्धन करतांना वरवरचे नव्हे, तर योग्य पद्धतीने प्रयत्न होणे अपेक्षित आहे.

मुळातच हिंदूंना धर्मशिक्षण न दिल्याने श्रद्धास्थानांविषयीचा आदर न्यून होतांना दिसत आहे, तसेच प्रशासनही प्राचीन स्थानांचे जतन आणि संवर्धन करण्यामध्ये पुष्कळ न्यून पडत आहे. ‘नदी महोत्सवा’च्या निमित्ताने विविध तज्ञ व्यक्ती व्याख्यानांमधून स्वतःची मते मांडतील; परंतु आता केवळ व्याख्याने ऐकून, त्याची वाहवा करून घरी जाणे अपेक्षित नाही. खरेतर गोदावरी नदीसह सर्वच नद्यांच्या संवर्धनासाठी आणि तिचे पावित्र्य जपण्यासाठी कृतीच्या स्तरावर प्रयत्न होणे, हे प्रत्येक भाविक अन् नागरिक यांचे कर्तव्य आहे.

– वर्षा कुलकर्णी, सोलापूर