सातारा, १३ डिसेंबर (वार्ता.) – श्रीक्षेत्र नारायणपूर येथील श्रीदत्त जन्मोत्सवाची सिद्धता पूर्ण झाली असून सातारा जिल्ह्यातील दत्त भक्तांच्या दिंड्या आणि पालख्या मार्गस्थ झाल्या आहेत. श्रीदत्त भक्तांचा उत्साह शिगेला पोचला असून विश्वचैतन्य सद्गुरु अण्णा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दत्त सेवेकरी मंडळ भाविकांच्या सेवेसाठी सज्ज आहे, अशी माहिती पोपट महाराज स्वामी यांनी दिली आहे. श्रीक्षेत्र नारायणपूर येथे १६ डिसेंबरपासून श्रीदत्तजयंती उत्सवास प्रारंभ होत आहे. १७ डिसेंबर या दिवशी सर्व दिंड्या आणि पालख्या यांचे स्वागत होईल. सायंकाळी ७ वाजून ३ मिनिटांनी श्रीदत्त जन्म सोहळा साजरा होणार आहे. १८ डिसेंबर या दिवशी पालखी ग्रामप्रदक्षिणा आणि श्रीदत्तजयंती उत्सव साजरा होणार आहे. तरी हा सोहळा अनुभवण्यासाठी समस्त दत्तभक्तांनी उपस्थित रहावे, असे आवाहन दत्त सेवेकरी मंडळाने केले आहे.