मुंबई येथील साधक श्री. अरविंद परळकर यांना वर्ष १९८७ मध्ये प.पू. डॉक्टरांच्या संदर्भात आलेल्या अनुभूतींचा पहिला भाग आपण २ डिसेंबर २०२१ च्या अंकात पाहिला. आज या लेखाचा उर्वरित भाग पाहूया.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/532115.html
मी वर्ष १९८७ मध्ये अभ्यासवर्ग चालू केल्यावर तेव्हा अभ्यासवर्गाला येणारे श्री. अरविंद परळकर यांनी त्या वेळच्या जुन्या आठवणी आणि इतिहास सांगणारा अप्रतिम लेख लिहिला आहे. त्यांच्या लेखामुळे मी पूर्णपणे विसरून गेलेला सनातनचा इतिहास आणि माझे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्या संदर्भातील मी विसरलेले अनेक प्रसंग पुन्हा आठवणीत आले. याबद्दल कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अपुरीच असेल. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
९. प.पू. डॉक्टरांनी अध्यात्मावर बोलू शकणारे साधक सिद्ध करण्यास आरंभ करणे
९ अ. प.पू. डॉक्टरांनी आतापर्यंत पुष्कळ अभ्यासवर्गांना उपस्थित असलेल्या साधकांना अधूनमधून बोलण्यास सांगून अध्यात्मावर बोलू शकणारे साधक सिद्ध करण्याचा त्यांचा मनोदय सांगणे : प.पू. डॉक्टर (परात्पर गुरु डॉ. आठवले) म्हणाले, ‘‘आता आपण जगासमोर आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन करणार आहोत. आपली प्रतिमा चांगली निर्माण होईल, याची आपण काळजी घेतली पाहिजे. शनिवार आणि रविवार दोन दिवस मीच बोलत राहिलो, तर ते बरे दिसणार नाही. आतापर्यंत तुम्ही बर्याच अभ्यासवर्गांना उपस्थित राहिले आहात. तेव्हा तुम्हीपण अधूनमधून काही सूत्रांवर (मुद्द्यांवर) बोला, म्हणजे मलाही मध्ये थोडा वेळ विश्रांती मिळेल आणि ‘प.पू. डॉक्टरांनी अध्यात्मावर बोलू शकणारे साधक सिद्ध केले आहेत’, अशी प्रतिमाही निर्माण होईल.’’
९ आ. अध्यात्मासारख्या कठीण विषयावर बोलतांना मधेच प्रश्न विचारले जात असल्याने ‘त्याची उत्तरे आपल्याला देता येणार नाहीत’, असा विचार मनात येऊन भीती वाटणे : ‘अध्यात्मासारख्या कठीण विषयावर बोलायचे आहे’, हे ऐकून सगळ्यांना धडकीच भरली; कारण मधेच लोक प्रश्न विचारतात. त्या वेळी आपल्याला उत्तर देता आले पाहिजे. कधी कधी प.पू. डॉक्टरांनाही उत्तर ठाऊक नसायचे. मग ते ध्यानातून उत्तर काढायचे आणि असे ध्यानातून उत्तर काढणे, हे तर आपल्याला शक्यच नाही. त्यामुळे ‘अध्यात्मावर ४० – ५० लोकांसमोर बोलायचे’, हे केवळ प.पू. डॉक्टरांनाच शक्य आहे. आपल्याला ते जमणारच नाही’, असा विचार सगळ्यांच्या मनात आला.
९ इ. ‘हे आपल्या गुरूंचे कार्य आहे आणि तेच हे करून घेतील’, अशी श्रद्धा पाहिजे’, असे प.पू. डॉक्टरांनी सांगणे आणि प.पू. डॉक्टरांविषयी ‘ते आपले गुरु असून तेच करून घेतील’, अशी साधकांच्या मनामध्ये श्रद्धा निर्माण झाली असल्याने तिघांनी वर्गात बोलण्याची सिद्धता दर्शवणे : तेव्हा प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘हे आपल्या गुरूंचे कार्य आहे आणि ते हे तुमच्याकडून करून घेतील’, अशी श्रद्धा पाहिजे.’’ प.पू. डॉक्टरांना तर आपण ‘नाही’ म्हणू शकत नाही. ‘तेच आपले गुरु असून तेच सगळं काही आपल्याकडून करून घेतील’, एवढी श्रद्धा आमच्यात निर्माण झाली होती. त्यामुळे मी, नितीन चुरी आणि सौ. साधनाताई पै अशा आम्ही तिघांनी वर्गात बोलण्याची सिद्धता दर्शवली. प.पू. डॉक्टरांनी आम्हाला प्रत्येकाला काही सूत्रे दिली आणि ‘पूर्वसिद्धता (तयारी) करून या’, असे सांगितले. ऐन वेळी सौ. साधनाताई काही कौटुंबिक अडचणीमुळे येऊ शकल्या नाहीत. मी आणि नितीन चुरी यांनी आपापली सूत्रे मांडली. साधनेच्या अंतर्गत सेवा म्हणून प.पू. डॉक्टरांच्या सांगण्यावरून मी केलेले हे पहिले आणि पुष्कळ मोठे धाडस होते अन् गुरुकृपेमुळे या प्रयत्नाला चांगले यशही मिळाले.
पुढे हे नित्याचेच झाले. प्रत्येक गुरुवारी प.पू. डॉक्टरांना भेटायचे आणि ‘या आठवड्याला कोणता विषय घेणार आहात ?’, हे विचारायचे. त्यातील प.पू. डॉक्टरांनी दिलेल्या सूत्रांचे काही कागद घरी घेऊन जायचे, सिद्धता करायची आणि अभ्यासवर्गात त्यावर बोलायचे.
१०. ग्रंथछपाई करण्याच्या दृष्टीने निरनिराळ्या संतांना भेटून, त्यांना प्रश्न विचारून किंवा निरनिराळे ग्रंथ वाचून माहिती गोळा करणे
१० अ. प.पू. डॉक्टरांनी संतांना विचारून आणि ग्रंथ वाचून मिळवलेली माहिती लहान-मोठ्या कागदाच्या तुकड्यांवर लिहून विषयवार वेगवेगळ्या संचिकांमध्ये (फोल्डर्समध्ये) ठेवणे : प.पू. डॉक्टर निरनिराळ्या संतांना भेटायचे, त्यांना प्रश्न विचारून किंवा निरनिराळे ग्रंथ वाचून ती माहिती लहान कागदाच्या तुकड्यांवर लिहून घ्यायचे किंवा मोठ्या कागदावर जरी माहिती लिहिलेली असली, तरी त्याचे वर्गीकरण करतांना त्या कागदाचे छोटे तुकडे करायचे आणि वेगवेगळ्या संचिकांमध्ये (फोल्डर्समध्ये) विषयवार ठेवायचे. अभ्यासवर्गात ज्या विषयावर बोलायचे असेल, त्या विषयाची संचिका घेऊन त्यातील सूत्रांवर बोलायला आरंभ करायचे.
१० आ. एका संचिकेमधील सर्व सूत्रे क्रमवार, सुवाच्य अक्षरांत, मोठ्या कागदावर लिहून काढणे आणि ती संचिकेमध्ये जोडणे : संचिकेमधील कागद सुटे असल्याने कधी कधी ते मागे-पुढे व्हायचे आणि क्रम चुकायचा, तसेच काही ठिकाणी घाईगडबडीत लिहिले असल्यास वाचणे अवघड होत असे; म्हणून मी एक संचिका घरी नेऊन त्यातील सर्व सूत्रे क्रमवार, सुवाच्य अक्षरांत, ‘फुलस्केप’ कागदावर लिहून काढली आणि ती धारिकेत (फाईलमध्ये) जोडली. त्यामुळे ‘प.पू. डॉक्टरांव्यतिरिक्त इतर कुणाला अभ्यासवर्गात बोलायचे असेल, तर ही धारिका घेऊन क्रमवार आणि मुद्देसूद बोलणे सोपे अन् सुटसुटीत होईल’, असे मला वाटले.
१० इ. संचिकेमधील छोटे छोटे कागद गहाळ होऊ नयेत; म्हणून त्या सर्वांची एक धारिका (फाईल) बनवण्यास सांगणे : प.पू. डॉक्टरांना हे समजल्यावर ते म्हणाले, ‘‘तू आता आपल्याकडे निरनिराळ्या विषयांच्या जेवढ्या संचिका आहेत, त्या सर्वांचीच एक एक धारिका (फाईल) बनव, म्हणजे संचिकेमधील छोटे छोटे कागद गहाळ होण्याचा धोका नाही आणि लिहितांना ‘कार्बन कॉपी’ (कार्बन प्रत) काढत जा, म्हणजे प्रत्येक विषयाच्या दोन धारिका होतील. त्यामुळे वर्गात बोलण्याची सिद्धता (तयारी) करण्यासाठी कुणी एक धारिका घेऊन गेला, तरी दुसरी धारिका माझ्या संग्रही असेल.’’
१० ई. सनातन संस्थेची स्थापना झाल्यावर आणि संस्थेकडे पुस्तक छपाईसाठी पुरेसा निधी जमा झाल्यावर याच धारिकांमध्ये आणखी काही माहितीची भर घालून, त्यांची छपाई करून ग्रंथ प्रकाशित करणे : माझा उत्साह वाढला आणि एक एक करून, त्या वेळी उपलब्ध असलेल्या ‘अध्यात्म’, ‘ईश्वर, परमेश्वर आणि अवतार’, ‘गणपति’, ‘विष्णु’, ‘शिव’, ‘दत्त’, ‘मारुति’, ‘सण, व्रते आणि सोळा संस्कार’ इत्यादी धारिकांमधील मुद्दे लिहून काढून त्यांच्या वेगवेगळ्या धारिका बनवल्या. पुढे सनातन संस्थेची स्थापना झाल्यावर आणि संस्थेकडे पुस्तक छपाईसाठी पुरेसा निधी जमा झाल्यावर याच धारिकांमध्ये आणखी काही माहितीची भर घालून त्यांची छपाई करून एक एक ग्रंथ प्रकाशित करण्यात आले. (समाप्त)
– श्री. अरविंद परळकर, मुंबई (२१.४.२०२०)
प.पू. डॉक्टरांच्या अनुपस्थितीत निरनिराळ्या ठिकाणी अभ्यासवर्ग आयोजित करून अध्यात्मप्रसार करणे !
१. ऐनवेळी प.पू. डॉक्टरांना प.पू. भक्तराज महाराज यांनी बोलावून घेतल्यावर त्यांनी त्यांच्या अनुपस्थितीत अभ्यासवर्ग चालू ठेवण्यास सांगणे : जोपर्यंत अभ्यासवर्ग चालू होते, तोपर्यंत प.पू. डॉक्टर तेथे आमच्या समवेत असायचे. ‘शिकवतांना आपले काही चुकले, तर ते सांभाळून घेतील’, असे वाटायचे; पण दोनदा ऐनवेळी प.पू. भक्तराज महाराज यांनी प.पू. डॉक्टरांना कांदळीला बोलावून घेतले. प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘आपण अभ्यासवर्ग ऐनवेळी रहित केला, तर नाव खराब होईल. येणार्यांची श्रद्धा न्यून होईल. अभ्यासवर्ग माझ्या अनुपस्थितीतही नेहमीप्रमाणेच होणार.’’
२. प.पू. डॉक्टरांच्या अनुपस्थितीत अभ्यासवर्गाचे दायित्व असल्यामुळे ‘अभ्यासवर्गात माझ्याऐवजी माझे गुरु तुझ्या पाठीशी असतील आणि अधिक पटींनी चैतन्य या अभ्यासवर्गात असेल’, असे प.पू. डॉक्टरांनी सांगणे : (सौ.) कुंदाताईही म्हणाल्या, ‘‘अभ्यासवर्ग व्हायलाच हवा.’’(show must go on.) माझ्या साहाय्याला सौ. साधनाताई आणि श्री. नितीन चुरी होते; पण ते माझ्यावर विसंबून होते. आतापर्यंत मी जी धडाडी दाखवली होती, त्यामुळे संपूर्ण अभ्यासवर्गाचे नेतृत्व आणि दायित्व माझ्यावर असणार होते. तेव्हा प.पू. डॉक्टर मला म्हणाले, ‘‘माझ्या गुरूंनी मला बोलावले आहे. तेव्हा उद्या अभ्यासवर्गात माझ्याऐवजी माझे गुरु तुझ्या पाठीशी असतील आणि त्यामुळे मी असतांना अभ्यासवर्गात जे चैतन्य असते, त्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक चैतन्य उद्याच्या अभ्यासवर्गात असेल.’’
३. अभ्यासवर्गात प.पू. भक्तराज महाराज यांचे अस्तित्व जाणवून साधकाच्या तोंडून प.पू. डॉक्टरच बोलत असल्याचे उपस्थितांनी सांगणे आणि तेव्हापासून प.पू. डॉक्टरांच्या अनुपस्थितीत अभ्यासवर्ग आयोजित करणे आणि ‘अध्यात्मप्रसारा’ची कल्पना उदयास येणे : ‘ज्या प.पू. भक्तराज महाराज यांचे अजून मला दर्शनही झाले नव्हते, ते अभ्यासवर्गात माझ्या पाठीशी असणार होते’, या कल्पनेनेच मला आत्मविश्वास दिला. त्या दिवशी अभ्यासवर्गाला येणार्यांची संख्या नेहमीपेक्षा अधिक होती. प.पू. डॉक्टरांच्या दवाखान्यात अभ्यासवर्ग चालू असल्यापासून येणार्या काही जणांनी सांगितले, ‘‘आज अभ्यासवर्गात प.पू. भक्तराज महाराज यांचे अस्तित्व जाणवले, ‘तुझ्या तोंडून प.पू. डॉक्टरच बोलत आहेत’, असे वाटले.’’ यातूनच ‘प.पू. डॉक्टरांच्या अनुपस्थितीत निरनिराळ्या ठिकाणी अभ्यासवर्ग आयोजित करायचे आणि अध्यात्मप्रसार करायचा’, ही कल्पना उदयास आली.’
– श्री. अरविंद परळकर, मुंबई (२१.४.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |