चीन गोपनीयरित्या त्याच्या अण्वस्त्रांमध्ये करत आहे वाढ ! – अमेरिकेचा अहवाल

चीनच्या अण्वस्त्रांचा धोका अमेरिकेपेक्षा भारताला अधिक असल्याने भारताने सतर्क रहाणे आणि चीनला जशास तसे उत्तर देणे आवश्यक आहे !

चीनची गोपनीयरित्या अण्वस्त्रांमध्ये वाढ

वॉशिंग्टन (अमेरिका) – चीन गोपनीयरित्या अण्वस्त्रांमध्ये सातत्याने वाढ करत आहे, असे अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय असणार्‍या ‘पेंटॅगॉन’च्या अहवालात म्हटले आहे.

१. या अहवालानुसार चीन वर्ष २०५० पर्यंत महाशक्ती असलेल्या अमेरिकेला मागे टाकून स्वतः महाशक्ती बनण्याचा प्रयत्न करत आहे. पुढील ६ वर्षांत चीनच्या अण्वस्त्रांची संख्या ७०० इतकी होऊ शकते. वर्ष २०३० पर्यंत ही संख्या १ सहस्रही होऊ शकते; मात्र चीनकडे सध्या किती अण्वस्त्रे आहेत ?, हे या अहवालात सांगण्यात आलेले नाही. गेल्या वर्षी पेंटॅगॉनने चीनच्या अण्वस्त्रांची संख्या २०० हून अल्प असल्याचे सांगितले होते, तर या दशकाच्या शेवटी ती दुप्पट होण्याची शक्यता वर्तवली होती.

२. अमेरिकेकडे मात्र ३ सहस्र ७५० अण्वस्त्रे आहेत आणि त्यात वाढ करण्याचे नियोजन नाही. वर्ष २००३ मध्ये ही संख्या १० सहस्र इतकी होती. नंतर ही अण्वस्त्रे निकामी करण्यात आली.