कृती दल समिती अंतिम निर्णय घेणार
पणजी, १२ नोव्हेंबर (वार्ता.) कोरोना व्यवस्थापनासाठी नेमण्यात आलेल्या आधुनिक वैद्यांच्या (डॉक्टरांच्या) तज्ञ समितीने इयत्ता १ ली ते ८ वीपर्यंतचे नियमित वर्ग चालू करण्याची शिफारस शासननियुक्त कृती समितीला केली आहे. डॉक्टरांच्या तज्ञ समितीच्या १२ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या बैठकीत ही महत्त्वाची शिफारस करण्यात आली. डॉक्टरांच्या तज्ञ समितीमध्ये बालरोगतज्ञ, वरिष्ठ डॉक्टर, साथीच्या रोगाचे तज्ञ, आदींचा सहभाग आहे. कृती दल समिती यावर अंतिम निर्णय घेणार आहे आणि नंतर सरकार शाळा चालू करण्यासंबंधीचा प्रत्यक्ष दिनांक घोषित करणार आहे.
कोरोनाच्या संसर्गामुळे सध्या शाळा गेली दोन वर्षे बंद आहेत. डॉक्टरांच्या तज्ञ समितीच्या शिफारसीनुसार इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंतचे नियमित वर्ग यापूर्वीच चालू झालेले आहेत. डॉक्टरांच्या तज्ञ समितीचे सदस्य डॉ. शेखर साळकर बैठकीविषयी माहिती देतांना म्हणाले, ‘‘बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व बालरोगतज्ञांचे शाळा चालू करण्यावर एकमत झाले. या दृष्टीने शाळा चालू करण्याची शिफारस सरकारला करण्याचा बैठकीत निर्णय झाला. गोव्यात कोरोना महामारी आटोक्यात आली आहे आणि आता सुरक्षित वातावरण आहे. कोरोनाच्या चाचणीच्या तुलनेत कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण राज्यात १ टक्क्यांहून अल्प झालेले आहे आणि यामुळे शाळा चालू करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. राज्यात इतर सर्व उद्योग पूर्ववत् चालू झाले आहेत आणि यामुळे शाळाही चालू झाली पाहिजे. केंद्रशासनाने अनुमती दिल्यानंतर मुलांनाही कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे.’’
प्राप्त माहितीनुसार राज्यातील साथीच्या रोगाचे तज्ञ उत्कर्ष बेतोडकर यांनी डॉक्टरांच्या तज्ञ समितीला सांगितले की, इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंतचे प्रत्यक्ष वर्ग चालू झालेले असले, तरी मुलांना कोरोनाचा संसर्ग होण्याची टक्केवारी गेले ३ मास १० टक्क्यांवरच राहिली आहे. केवळ राज्यातील रुग्णालयांमध्ये कोरोनाचा प्रभाव असल्याने उपचारासाठी एकही मुलगा रुग्णालयात भरती झालेला नाही.