सांगली एस्.टी. आगारात खासगी गाड्या लावून पोलीस बंदोबस्तात प्रवासी वाहतूक चालू !

सांगली बसस्थानकात फलाटावर उभ्या असलेल्या खासगी गाड्या

सांगली, १० नोव्हेंबर (वार्ता.) – नेहमी खासगी बस, प्रवासी वाहतूक करणार्‍या काळ्या-पिवळ्या गाड्या या कोणत्याही बसस्थानकाच्या बाहेर थांबलेल्या असतात, असे चित्र असते. एस्.टी.च्या संपामुळे हे चित्र पालटले असून एस्.टी.च्या आगारात खासगी गाड्या लावून पोलीस बंदोबस्तात प्रवासी वाहतूक चालू करण्यात आली आहे. परिवहन विभागाने प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून बसस्थानकातून खासगी प्रवासी बस, ‘स्कूल बस’, मालवाहू वाहने आदींना प्रवासी वाहतूक करण्यास अनुमती दिली आहे. त्यामुळे सांगली बसस्थानकात प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी काळी-पिवळी गाडी, खासगी बस फलाटावर उभ्या असल्याचे दिसून आले.

सांगली जिल्ह्यात ४ सहस्र ७०० कर्मचारी संपात सहभागी असून दैनंदिन १ सहस्र ३६६ फेर्‍या रहित होत आहेत. ऐन दीपावलीच्या काळात संप पुकारण्यात आल्याने गावाकडे परतणार्‍या प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. ‘खासगी गाड्यांना एस्.टी.प्रमाणे तिकीट दर आकारण्याच्या सूचना दिल्या असून उपलब्ध होतील, तसे सर्वच मार्गांवर वाहतूक चालू करू’, असे परिवहन विभागाने सांगितले आहे.