अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांच्या भूमिकेविषयी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका तटस्थ !

‘राष्ट्रीय प्रवक्ता’ या महत्त्वाच्या पदावर असूनही पक्षातील एकाही नेत्याचा पाठिंबा नाही

नवाब मलिक

मुंबई, १० नोव्हेंबर (वार्ता.) – ‘क्रूझ’वरील कारवाईत आर्यन खान याच्या अटकेनंतर सातत्याने प्रसिद्धीमाध्यमांपुढे येऊन आणि पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांनी अमली पदार्थविरोधी पथकाचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत; मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमधील एकाही नेत्याने अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांच्या आरोपांना किंवा त्यांना वैयक्तिक पाठिंबा घोषित केलेला नाही. ‘राष्ट्रीय प्रवक्ते’ हे महत्त्वाचे पद असलेल्या या नेत्याला पाठिंबा देण्याचे दूर; पण त्यांच्याविषयी भूमिकाही न घोषित करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आश्चर्य व्यक्त करणारी आहे. यावरून ‘नवाब मलिक मांडत असलेल्या आरोपांविषयी राष्ट्रवादी काँग्रेसलाच साशंकता आहे का ?’ असा प्रश्न राजकीय विश्लेषकांकडून उपस्थित केला जात आहे.

मागील २ दिवसांपासून नवाब मलिक यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही आरोप केले आहेत. याविषयी १० नोव्हेंबर या दिवशी पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावरही गुन्हेगारी जगताशी संबंध असल्याचा गंभीर आरोप केला. विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेत फडणवीस यांच्या जोडीला भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते. दुसरीकडे मात्र मागील अनेक दिवसांपासून नवाब मलिक एकांगीपणे त्यांची बाजू मांडत आहेत. त्यांच्या बाजूला बसण्यासाठीही राष्ट्रवादी काँग्रेसचा कुणी नेता आलेला नाही.

सध्या अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी अनिल देखमुख यांची बाजू मांडण्यासाठी देहली येथे पत्रकार परिषद घेतली होती; मात्र देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप करूनही नवाब मलिक यांची बाजू राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही प्रवक्त्यांनी सार्वजनिकरित्या घेतलेली नाही. मागील अनेक दिवस आर्यन खान याची बाजू नवाब मलिक मांडत आहेत; मात्र त्यांच्या भूमिकेशी त्यांचा काहीही संबंध नसल्याचे आर्यन खान याच्या अधिवक्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात सांगितले आहे. आर्यन खान याच्या अधिवक्त्यांनी एकवेळ असे म्हणणे समजण्यासारखे आहे; मात्र पक्षाच्या पहिल्या फळीतील या नेत्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसची तटस्थता आश्चर्यकारक आहे. ‘देशमुखांची बाजू घेऊन प्रकरण अंगलट आल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेस सावध भूमिका घेत आहे का ?’ असाही प्रश्न निर्माण होत आहे.