-
प्रादेशिक परिवहन विभागाची डोळेझाक !
-
सांगली-कोल्हापूर २०० रुपये, तर कोल्हापूर-पुणे १ सहस्र रुपयांची आकारणी
कोल्हापूर, ९ नोव्हेंबर (वार्ता.) – ‘एस्.टी.’च्या संपामुळे सर्व आगारांमधील कामकाज ठप्प झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट केली जात आहे. दीपावलीच्या निमित्ताने स्वत:च्या गावी परत जाणार्या प्रवाशांना सध्या खासगी गाड्यांविना कोणताच पर्याय उपलब्ध नसल्याने खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट केली जात आहे. कोल्हापूर-पुणे १ सहस्र रुपये, तर मुंबईसाठी १ सहस्र ५०० रुपयांहून अधिक भाडे घेतले जात आहे. कोल्हापूर-सांगली-सातारा अशा जवळच्या जिल्ह्यांमध्ये वाहतूक करणार्या काळ्या-पिवळ्या रंगाच्या गाड्या आणि अवैध वाहतूकदार प्रवाशांकडून दुप्पट-तिप्पट-चौपट दराची आकारणी करत आहेत. अनेक शहरांमध्ये प्रवासी अडकून पडले आहेत, अशी स्थिती आहे. (खासगी वाहतूकदार प्रवाशांची लूट करत असतांना प्रादेशिक परिवहन विभाग नेमका काय करत आहे ? सामान्यांचा खिसा रिकामा झाल्यावर प्रादेशिक परिवहन विभागास जाग येणार आहे का ? – संपादक)
विशेषत: लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यातून रात्री-अपरात्री रेल्वेस्थानकांवर उतरणार्या प्रवाशांना त्यांच्या गावाकडे कसे जायचे ?, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. जे तेथून पुढील प्रवासासाठी गाडीची सोय करू शकत नाही, त्यांना रेल्वेस्थानकाबाहेर असलेल्या रिक्शा, तसेच खासगी गाडीचालक ते सांगतील तो दर देऊन प्रवास करण्याविना पर्याय नाही, अशी स्थिती आहे. सांगली-कोल्हापूर या केवळ ५० किलोमीटरच्या मार्गासाठी २०० ते ४०० रुपये, सांगली- इचलकरंजी १०० रुपये देऊन आणि तेही अत्यंत दाटीवाटीने नागरिकांना प्रवास करावा लागत आहे.
कोल्हापूर विभागाची १ कोटी २२ लाख रुपयांची हानी !
राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागात एकूण १२ आगार असून या संपामुळे कोल्हापूर विभागाची १ कोटी २२ लाख रुपयांची हानी आतापर्यंत झाली आहे. सांगली जिल्ह्याचा विचार केल्यास ८ नोव्हेंबर या दिवशी ३ सहस्र फेर्या रहित कराव्या लागल्या. त्यामुळे ३२ लाख ९८ सहस्र रुपयांची हानी झाली आहे.