दुसरा डोस घेतलेले अवघे ३२ टक्केच !
आरोग्यदृष्ट्या निर्माण झालेल्या आपत्कालीन स्थितीतही लसीकरण पूर्ण न करणारे असंवेदनशील नागरिक ! स्वतःच्या आरोग्याविषयी हलगर्जीपणा करणारे नागरिक राष्ट्राचा विचार कधीतरी करू शकतील का ? – संपादक
श्री. सचिन कौलकर, मुंबई
मुंबई – कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे २ डोस घेतल्यासच कोरोनापासून रक्षण होऊ शकते. असे असूनही महाराष्ट्रातील ७५ लाख नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेण्यास नकार दिला आहे. अपसमज, तसेच ‘कोरोनाचा प्रभाव अल्प झालेला आहे’, असा समज करून नागरिक दुसरा डोस घेत नाहीत. त्यामुळे राज्यातील बर्याच आरोग्य केंद्रांवर दुसरा डोस घेण्यासाठी गर्दीच नसते.
१. राज्यातील आतापर्यंत ९ कोटी ७२ लाख इतके एकूण लसीकरण झाले आहे; पण त्यापैकी दुसरा डोस घेतलेले अवघे ३२ टक्के इतकेच आहेत. दुसर्या डोसची मुदत उलटून गेली, तरीही अनेक नागरिक लसीकरण केंद्रात आलेले नाहीत. राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये दोन्ही मात्रा पूर्ण केलेल्यांचे प्रमाण २५ टक्क्यांहूनही अल्प आहे.
२. पहिल्या मात्रेचे सर्वाधिक ९८ टक्के लसीकरण मुंबईत, तर त्या खालोखाल ९३ टक्के पुणे, ९१ टक्के भंडारा आणि सिंधुदुर्गमध्ये ८८ टक्के लसीकरण झाले आहे. दोन्ही मात्रा पूर्ण झालेल्यांमध्ये मुंबई प्रथम क्रमांकावर असून ५८ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यानंतर पुण्यात ५० टक्के, भंडारा येथे ४५ टक्के आणि सिंधुदुर्गमध्ये ४७ टक्के नागरिकांच्या दोन्ही मात्रा पूर्ण झाल्या आहेत.
३. राज्यात सध्या कोविशिल्डच्या लसीचे अनुमाने ६० लाख, तर ‘कोव्हॅक्सिन’ लसीचे अनुमाने १५ लाख, अशा एकूण ७५ लाख नागरिकांनी दुसर्या मात्रेची नियोजित वेळ होऊनही लस घेतलेली नाही. सध्या राज्यात अनुमाने ५६ लाखांहून अधिक लसींचा साठा शिल्लक आहे; परंतु नागरिक दुसरी मात्रा घेण्यासाठी येत नाहीत. ‘आजाराची तीव्रता अधिक असल्यावर नागरिक भीतीने लसीकरणासाठी येतात; परंतु तीव्रता अल्प झाल्यानंतर लसीकरणाचे प्रमाण अल्प होते’, असे तज्ञांचे निरीक्षण आहे.
४. मुंबईत तब्बल ३ लाख लोकांनी कालावधी लोटल्यानंतरही दुसरा डोस न घेतल्याने महापालिका अशांचा शोध घेत आहे.
५. मुंबई येथे ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत ९१ लाख १५ सहस्र ६०८ लोकांनी पहिला डोस घेतला, तर ५५ लाख ६४ सहस्र १६५ लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. मुंबईत १८ वर्षांवरील ९२ लाख ३६ सहस्र ५० लोकांचे लसीकरण होणे अपेक्षित आहे; मात्र आतापर्यंत पहिला डोस हा जवळपास ९९ टक्के लोकांनी घेतला आहे, तर ६० टक्के लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत.
६. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले की, ३ लाख लोकांची दुसर्या डोससाठी २४ विभाग कार्यालयांमधून सूची सिद्ध केली आहे. त्यांचा निवासी पत्ता नसल्याने त्यांच्याकडील भ्रमणभाष क्रमांकाच्या आधारे संपर्क साधण्यात येत आहे. आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून झोपडपट्ट्यांमधूनही लसीकरण न झालेल्यांचा शोध घेण्यात येत आहे.