देवतांची चित्रे असलेल्या फटाक्यांची विक्री करू नये यासाठी लातूर येथील ‘वीर योद्धा संघटने’कडून जनजागृती आणि निवेदन !

देवतांची चित्रे असलेल्या फटाक्यांची विक्री होऊ नये, यासाठी प्रयत्नरत असणार्‍या लातूर येथील ‘वीर योद्धा संघटने’चे अभिनंदन ! या संघटनेचा आदर्श घेऊन अन्यत्रच्या संघटनांनीही याविषयी प्रबोधन करावे. – संपादक

निवेदन देण्यासाठी एकत्र जमलेले ‘वीर योद्धा संघटने’चे कार्यकर्ते

लातूर, ४ नोव्हेंबर (वार्ता.) – येथील ‘वीर योद्धा संघटना’ ही संघटना देवतांची चित्रे असलेल्या फटाक्यांची विक्री होऊ नये, यासाठी मागील अनेक वर्षांपासून प्रयत्नरत आहे. या संघटनेने प्रारंभी व्यापार्‍यांचे देवतांची चित्रे असलेल्या फटाक्यांची विक्री न करण्याविषयी प्रबोधन केले, तसेच या संदर्भात पोलीस ठाणे आणि जिल्हाधिकारी कार्यालय येथे मागील अनेक वर्षांपासून सातत्याने निवेदने देऊन पाठपुरावा केला. या वर्षी जिल्हाधिकारी म्हणाले, ‘‘जिथे फटाक्यांचा कारखाना आहे किंवा साठा आहे तिथे जाऊन तो साठा जप्त करतो.’’ संघटनेने व्यापार्‍यांनी देवतांची चित्रे असलेल्या फटाक्यांची विक्री करू नये, याविषयी प्रबोधन केले आणि व्यापार्‍यांनीही यापुढे देवतांची चित्रे असलेल्या फटाक्यांची विक्री न करण्याचे मान्य केले.

वीर योद्धा संघटनेने पोलीस ठाण्यात निवेदन दिल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी व्यापार्‍यांची बैठक घेऊन ‘देवतांची चित्रे असलेल्या फटाक्यांची विक्री करू नये’, असे आवाहन केले. या उपक्रमामध्ये वीर योद्धा संघटनेचे राष्ट्रीय प्रमुख श्रीकांत रांजणकर, महाराष्ट्र राज्य प्रमुख श्रीकृष्ण पाडे पाटील, जिल्हाप्रमुख नुतन हनुमंते, जिल्हा कार्याध्यक्ष ऋषिकेश इंगळे पाटील, जिल्हा व्यापारी प्रमुख नरेंद्र बोरा, महासंघटक रामबहादूर यादव, महासहसंघटक रमेश शिंदे, निलकंठ किल्लारीकर यांनी पुढाकार घेतला. तर याविषयीच्या निवेदनावर १ सहस्र नागरिकांनी स्वाक्षर्‍या केल्या आहेत.