फटाक्यांचे विविध स्तरांवर होणारे दुष्परिणाम पहाता त्यावर सरकारने बंदी घालणेच आवश्यक !
दिवाळी सणाच्या वेळी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात फटाके विक्रीवर बंदी घालण्याच्या संदर्भात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पत्रक काढले. ‘सध्या कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण अल्प होत आहे. त्यामुळे फटाकेबंदीचा प्रस्ताव चुकीचा आहे’, असे सांगत नाशिक महापालिकेच्या सभेत ‘विभागीय आयुक्तांनी सादर केलेला प्रस्ताव सर्वानुमते फेटाळण्यात आला आहे’, असे महापौर सतीश कुलकर्णी यांनी सांगितले. विशेष म्हणजे याचे वृत्त देतांना काही प्रसारमाध्यमांनी ‘फटाक्यांमुळे नाशिककरांची दिवाळी जोरात साजरी होणार’, असे खोडसाळपणाचे वृत्त दिले. ‘कोरोना संसर्गाच्या काळात फटाके विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आल्याने ती दुकाने चालू करण्याची मागणी करत फटाक्यांवरील बंदी उठवण्यात आली आहे’, असे कारण सांगितले जाते; मात्र काही श्रीमंत फटाके विक्रेत्यांचा विचार करून फटाक्यांवरील बंदी उठवणे हे कितपत योग्य आहे ? खरेतर महापौरांनी फटाकेबंदीचा प्रस्ताव फेटाळून एक प्रकारे लोकांचे आरोग्यच धोक्यात आणले आहे. लोकप्रतिनिधींच्या अशा घातक निर्णयामुळे देशाची हानी होत आहे.
चीनमधून येणार्या फटाक्यांमध्ये कार्बन मोनोऑक्साईड असल्याने ते उडवल्यावर लोकांना दम्याचा आजार होण्याची शक्यता आहे. एकीकडे देश कर्जबाजारी आहे आणि कोरोना महामारीमुळे बेकारीमध्ये भर पडली आहे, तर दुसरीकडे देशभरात प्रतिवर्षी केवळ फटाक्यांवर अब्जावधी रुपयांचा व्यय होत असतो. असे असतांना कोट्यवधी रुपयांचा असा अपव्यय करणे योग्य आहे का ? गेल्या २० वर्षांत देहली, हरियाणा आणि महाराष्ट्रातील जळगाव येथे फटाक्यांमुळे आग लागून ४२५ हून अधिक जणांचे बळी गेले आहेत, तसेच तमिळनाडूतील शिवकाशी येथे फटाके बनवण्याच्या कारखान्याला आग लागून ५२ जणांचा मृत्यू, तर ७० हून अधिक घायाळ झाले होते.
गणेशोत्सव, दिवाळी, ख्रिसमस यांसह इतर सणांच्या वेळी फटाके मोठ्या प्रमाणात उडवले जातात. या माध्यमातून ध्वनीप्रदूषण, वायूप्रदूषण वाढण्यासह आध्यात्मिक स्तरावर तमोगुण वाढतो. फटाक्यांचे नकारात्मक परिणाम बघता त्याचे तोटेच अधिक आहेत. सणांच्या वेळेला त्या त्या देवतांचा नामजप केलेला देवाला आवडेल कि फटाके उडवून पैशांची उधळपट्टी केलेले आवडेल ? याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. फटाक्यांचे दुष्परिणाम लक्षात घेऊन लोकप्रतिनिधींनी स्वतःची मानसिकता पालटावी आणि फटाक्यांवर कायमस्वरूपी बंदी घालण्यासाठी प्रयत्न करावेत, ही अपेक्षा !
– श्री. सचिन कौलकर, मुंबई.