बांगलादेशमध्ये दुर्गापूजेच्या मंडपात कुराण ठेवणारा ३५ वर्षीय इक्बाल हुसेन असल्याचे उघड !

  • ‘हिंदूंवर कुराणाचा अवमान केल्याचे सांगून आक्रमण करणारे धर्मांध आता दुर्गापूजेच्या मंडपात कुराण ठेवणार्‍या त्यांच्या धर्मबांधवावर आक्रमण करणार का ?’, असा प्रश्‍न कुणी विचारला, तर तो चुकीचा ठरू नये ! – संपादक
  • हिंदूंवर आक्रमण करण्यासाठीच अशा प्रकारचे कट धर्मांधांकडून रचले जात आहेत, हे लक्षात घेऊन हिंदूंना आता अधिक सतर्क रहाण्याची आणि त्यांच्यावर होणारी आक्रमणे परतवून लावण्याची आवश्यकता आहे ! – संपादक
दुर्गापूजेच्या मंडपात कुराण ठेवणारा इक्बाल हुसेन (वर्तुळात)

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात कुराणाचा अवमान झाल्याचा आरोप करत धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण केल्याच्या प्रकरणात अनेक हिंदू ठार झाले. आता या प्रकरणी कोमिला शहरातील पोलिसांनी नानूआ दिघी परिसरातील श्री दुर्गादेवी पूजा मंडपातील श्री हनुमानाच्या मूर्तीच्या पायाजवळ कुराण ठेवणार्‍या संबंधित व्यक्तीची ओळख पटवली आहे. ३५ वर्षीय इक्बाल हुसेन असे त्या व्यक्तीचे नाव असून तिनेच कुराण मूर्तीच्या पायजवळ ठेवले. हुसेन याची अधिक चौकशी केली जात आहे. तो मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचेही सांगितले जात आहे. (भारत असो कि बांगलादेश धर्मांधांनी हिंदूंच्या धार्मिक गोष्टीचा अवमान केल्यावर संबंधित व्यक्ती नेहमीच मानसिकदृट्या अस्थिर असल्याचे पोलिसांकडून घोषित करून प्रकरण दडपले जाते, हे लक्षात घ्या ! – संपादक) मंडपामध्ये लावलेल्या कॅमेर्‍यांमधून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजचे विश्‍लेषण केल्यानंतर हिंसाचारात इक्बाल हुसेनचा सहभाग उघड झाला. पोलिसांनी मिळवलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसते की, इक्बाल कुराणची एक प्रत मशिदीतून दुर्गापूजेच्या ठिकाणी नेतो. नंतर तो श्री हनुमानाच्या मूर्तीजवळ जातांना दिसतो.

कोमिलाचे पोलीस अधीक्षक फारूक अहमद यांनी सांगितले की, आरोपी इक्बाल हुसेन हा भटक्या असून त्याला अद्याप कह्यात घेण्यात आलेले नाही. कुराणाच्या कथित अवमानानंतर शहरात झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी पोलिसांनी ४ गुन्हे नोंदवून ४१ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी ४ जण इक्बाल हुसेन याचे सहकारी आहेत.

इस्लामवादी हुसेन याला जिवंत का खात नाहीत ? – तस्लिमा नसरीन

तस्लिमा नसरीन

इक्बाल हुसेन याने हनुमान मूर्तीच्या मांडीवर कुराण ठेवले आणि त्याची गदा  चोरली. कुराणाचा अनादर केला म्हणून इस्लामवादी त्याला जिवंत का खात नाहीत ? आधीच इस्लामवाद्यांनी हिंदूंना दोष दिला आणि त्यांनी न केलेल्या ‘अपराध’साठी त्यांची संपत्ती नष्ट केली, अशी टीका बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी ट्वीट करत धर्मांधांवर केली आहे.