उत्तरप्रदेश राज्यातील लखीमपूर येथे शेतकर्यांच्या विरोधात झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष म्हणजे महाविकास आघाडीने ११ ऑक्टोबर या दिवशी ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला होता; मात्र या ‘बंद’ला भाजपने विरोध केला आहे. या ‘बंद’च्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले.
मुंबई आणि ठाणे येथे नागरिकांचे हाल !
-
बेस्टच्या ८ गाड्यांची तोडफोड !
-
टी.एम्.टी.ला १८ लाखांचा तोटा
मुंबई – या बंदच्या काळात बेस्टच्या ८ बसगाड्यांची तोडफोड करण्यात आली. बेस्ट जवळजवळ दिवसभर बंद होत्या. या तोडफोडीमुळे सकाळी गर्दीच्या वेळी काही बस आगराबाहेर निघू न शकल्याने मुंबईकरांचे हाल झाले. दुपारनंतर पोलीस संरक्षणात बससेवा काही ठिकाणी चालू करण्यात आली. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसह काही बाजारपेठा बंद होत्या; मात्र खासगी आस्थापने, सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत चालू होती.
ठाण्यात रिक्शाचालकांना मारहाण !
ठाणे शहरात रेल्वेस्थानकाच्या बाहेर शिवसैनिकांकडून रिक्शाचालकांना मारहाण करण्याचा प्रकार घडला. एक शिवसैनिक हातात काठी घेऊन होता. तो काठीने रिक्शाचालकांना मारत असल्याचा आणि एक रिक्शाचालक रिक्शाचालकांना अक्षरशः कानशिलात मारत होता, असे चित्रीकरणात दिसत आहे. टेंभी नाका भागातही माजी नगरसेवक गिरीश राजे, शिवसैनिक किरण नाक्ती यांनी येथून येणार्या रिक्शाचालकांना मारहाण करत रिक्शा बंद ठेवण्यास सांगितले. विशेष म्हणजे महापौरांनी या प्रकाराचे समर्थन केले.
ठाण्यात शिवसैनिकांची दादागिरी; रिक्षाचालकांना दांडक्याने मारहाण करत बंदमध्ये सहभागी होण्याचा इशारा #Shivsena #MaharashtraBandh pic.twitter.com/0Ivmu2IWG0
— Lokmat (@MiLOKMAT) October 11, 2021
हा बंद यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर उतरून फेरी काढत नागरिकांना बंद पाळण्याचे आवाहन केले. या फेरीमध्ये महापौर नरेश म्हस्के हेही सहभागी झाले होते. व्यापार्यांनीही त्यांची दुकाने बंद ठेवली होती.
ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेची एकही बसगाडी रस्त्यावर न धावल्याने टी.एम्.टी.ला सुमारे १८ लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला. बंदचा चांगलाच फटका नोकरदारांना बसला. काही ठिकाणी रिक्शाचालक अधिक भाडे आकारून प्रवाशांना नियोजित स्थळी नेत होते, तर अनेकांनी पायपीट करत नियोजित ठिकाण गाठले. ‘बंदमध्ये सहभागी होऊ नका’, असे आवाहन परिवहन विभागाच्या कर्मचार्यांना करण्यात आले होते, तरी या बंदमध्ये कर्मचारी सहभागी झाल्याने त्यांचे एका दिवसाचे वेतन कापले जाईल किंवा एका दिवसाची सुटी दाखवली जाणार असल्याचे परिवहन प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
कायदा हातात घेऊन लोकांना बंद करण्यास भाग पाडणार्यांच्या विरोधात गुन्हे नोंद करावेत, अशी मागणी भाजपचे ठाणे येथील आमदार संजय केळकर यांनी केली आहे.
काँग्रेसचे राजभवनावर मूक आंदोलन
मुंबई – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली राजभवनात मूक आंदोलन करण्यात आले. या वेळी ‘उत्तरप्रदेशातील लखीमपूरमध्ये शेतकर्यांच्या आंदोलनाच्या वेळी झालेल्या अपघाताप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी’, यासह अन्य मागण्यांचे निवेदन देण्यात आले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राजभवनात उपस्थित नसल्याने त्यांच्या वतीने वरिष्ठ अधिकार्यांनी हे निवेदन स्वीकारले.
‘महाराष्ट्र बंद’ हा सरकारपुरस्कृत आतंकवाद ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
मुंबई – आजचा बंद संवेदना दाखवणारा नाही, तर राजकीय पोळी भाजण्यासाठीच करण्यात आलेला आहे. या बंदला लोकांचा प्रतिसाद नसून प्रशासनाच्या साहाय्याने दमदाटी करून पोलीस दुकाने बंद करत आहेत. हा बंद सरकारपुरस्कृत आतंकवाद आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ११ ऑक्टोबर या दिवशी पत्रकार परिषदेत केली.
या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘लखीमपूर येथील घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्रात बंद केला जातो; पण महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी हे सरकार एकही पैसा द्यायला सिद्ध नाही. अतीवृष्टीग्रस्त शेतकर्यांसाठी सरकारने निधी घोषित करावा, अन्यथा त्यांचा ढोंगीपणा उघड होईल. राज्यातील शेतकरी संकटात आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून आतापर्यंत २ सहस्र शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. सरकारने बांधावर जाऊन आर्थिक साहाय्य करण्याची घोषणा केली; मात्र ही घोषणा हवेतच विरली आहे. अनेक संकटांमध्ये सरकारने शेतकर्यांना साहाय्य केलेले नाही आणि साहाय्य केले असले, तरी ते अपुरे आहे. मावळमध्ये पाणी मागणार्या शेतकर्यांवर याच सरकारने गोळीबार केला होता. अशा सरकारला आंदोलन करण्याची नैतिक अधिकार आहे का ? या सरकारने कोरोनाच्या संकटकाळात महाराष्ट्र बंद केला. आता कुठे छोटे दुकानदार आणि व्यापारी यांचे गाडे रुळावर येत असतांना सरकारने बंद पुकारला. त्यामुळे या सरकारचे नावच ‘बंद सरकार’ आहे.’’
वरणगाव (जिल्हा जळगाव) येथे महाविकास आघाडी आणि भाजप पक्ष यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी !
जळगाव – महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे हिंसेचे गालबोट लागले आहे. वरणगाव शहरामध्ये महाविकास आघाडी आणि भाजप या पक्षांतील कार्यकर्ते समोरासमोर येऊन त्यांच्यात हाणामारी झाली. यामध्ये अनेक कार्यकर्ते घायाळ झाले आहेत. दोन्ही बाजूंकडील घायाळ कार्यकर्त्यांना उपचारासाठी रुग्णालयांमध्ये भरती करण्यात आले आहे.
वरणगाव येथे महाविकास आघाडीच्या वतीने बंद पुकारण्यात आला होता. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते शांततेत ‘बंद’ पाळण्याचे आवाहन करत होते, तर भाजपचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी ‘‘बंद’ पाळू नका’, असे आवाहन करत होते. दोन्हीकडून ‘बंद’ संदर्भात शहरात वेगवेगळा प्रचार केला जात असतांनाच दोन्ही बाजूंकडील पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर आले आणि त्यांच्यात हाणामारी झाली. दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर मारहाणीचे आरोप केले जात आहेत.
‘आम्ही शांततेमध्ये शेतकर्यांना पाठिंबा देण्यासाठी ‘बंद’ला समर्थन द्या’, असे सांगत असतांना भाजपच्या लोकांनी तेथे येऊन गोंधळ घातल्याने वाद झाला’, असे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे, तर भाजपचे शहराध्यक्ष सुनील महाडिक यांनी ‘आम्ही व्यापार्यांना ‘दुकान बंद करू नका’, असे सांगत शहरामध्ये फिरत असतांना अचानक जमावाने आमच्यावर आक्रमण केले आहे’, असा दावा केला आहे.
जळगाव – महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी शहरातील प्रमुख बाजारपेठेत फिरून व्यापार्यांना बंद पाळण्याचे आवाहन केले, तसेच केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. लखीमपूर येथील शेतकरी हत्याकांडाची घटना दुर्दैवी आणि निषेधार्ह असल्याचे सांगत संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली.
चंद्रपूर – शिवसैनिकांनी शिवभोजन थाळी देणार्या बसस्थानकाच्या समोरील ‘मयूर शिवभोजन थाळी’ उपाहारगृहाची तोडफोड केली. यात उपाहारगृहाच्या मालकाची पुष्कळ हानी झाली. शिवभोजन थाळी हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा महत्त्वाचा उपक्रम असतांनाही अशी तोडफोड झाल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अमरावती – शहरात महाविकास आघाडीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाच्या माध्यमातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि कम्युनिस्ट पक्ष यांच्या कार्यकर्त्यांनी व्यापार्यांना स्वतःची प्रतिष्ठाने बंद करण्याचे आव्हान केले. शहरात मोर्चा निघताच सकाळी चालू झालेली बाजारपेठ सकाळी ११ वाजता बंद करण्यात आली.
बुलढाणा – येथे काही कार्यकर्त्यांनी दुकानदारांना बळजोरीने दुकाने बंद करायला लावून दुकानदारांना दुकानात कोंडले.
वाशिम – महाविकास आघाडीच्या वतीने आमदार अमित झनक, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश मापारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी शहरात मोटारसायकल फेरी काढून दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. जिल्ह्यात अत्यावश्यक सेवांमधील चिकित्सालये आणि वैद्यकीय सेवा वगळता सर्वच बाजारपेठ बंद होत्या.
‘महाराष्ट्र बंद’ला सांगली, कोल्हापुरात संमिश्र प्रतिसाद, तर सोलापुरात प्रतिसाद नाही !
कोल्हापूर – लखीमपूर खीरी घटनेसाठी पुकारण्यात आलेल्या बंदला सांगली-कोल्हापुरात संमिश्र प्रतिसाद मिळाला, तर सोलापुरात प्रतिसाद मिळाला नाही. सांगलीला दुपारी २ पर्यंत काही ठिकाणी दुकाने बंद ठेवण्यात आली होती. सांगलीत महाविकास आघाडीच्या वतीने शहरातील प्रमुख मार्गांवरून फेरी काढून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीजवळ फेरीचा समारोप करण्यात आला. बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोल्हापूर शहरात शिवसेनेच्या वतीने दुचाकी फेरी काढून बंदचे आवाहन करण्यात आले. कागलला राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. या वेळी पोलिसांनी आंदोलकांना कह्यात घेतले. इचलकंरजी शहरातही बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
कोल्हापूर येथील आंदोलनात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार आणि विजय देवणे, करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव, युवासेनेचे मंजित माने यांसह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.
अन्य घडामोडी
१. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने दुपारी १२ पर्यंत व्यवहार बंद ठेवून बंदला पाठिंबा दिला होता. पहाटे भाजीपाला, फळ यांचे लिलावही सुरळीत पार पडले, तर दुपारी १२ नंतर कांदा, तसेच अन्य लिलाव मात्र नेहमीप्रमाणे चालू झाले. शहर आणि जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीतपणे चालू होती, तसेच शहरातील बहुतांश व्यवहारही सुरळीत चालू असल्याचे चित्र होते. त्यामुळे सोलापुरात बंदला प्रतिसाद नसल्याचे दिसून आले.
२. कराड येथे महाविकास आघाडीच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यानंतर प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना निवेदन देण्यात आले. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला.
महाराष्ट्र बंद अयशस्वी ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप
कोल्हापूर – लखीमपूर घटनेशी भाजपचा संबंध जोडणे चुकीचे आहे आणि त्यासाठी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देणे पूर्णत: चुकीचे आहे. ‘महाराष्ट्र बंद’ अयशस्वी झाला असून जे बंद, ते भीतीने होत आहे. बंद करायला कार्यकर्ते नाहीत, अशी महाविकास आघाडीची स्थिती आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.