दीड वर्षानंतर जिल्ह्यातील शाळा पुन्हा चालू

प्रतिकात्मक छायाचित्र

सिंधुदुर्ग – कोरोना महामारीमुळे बंद असलेल्या शाळा दीड वर्षाच्या कालावधीनंतर ४ ऑक्टोबरपासून चालू झाल्या. त्यामुळे शिक्षकांसह विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. या वेळी कोरोनाविषयक नियमांचे काटेकोर पालन केले जात असल्याचे दिसून आले.

महाराष्ट्र राज्यात कोरोनाविषयीचे सर्व नियम पाळून शहरी भागातील इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंतचे, तर ग्रामीण भागातील इयत्ता ५ वी ते इयत्ता १२ वीपर्यंतचे वर्ग चालू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शाळा चालू करण्यात आल्या. शाळांच्या व्यवस्थापनाकडून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शाळा चालू झाल्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांच्या शरिराचे तापमान मोजण्यात आले. त्यानंतर सामाजिक अंतर पाळून आणि कोरोनाचे नियम पाळून विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला. ‘एका बाकावर १ विद्यार्थी’, याप्रमाणे विद्यार्थ्यांना बसवण्यात येऊन वर्ग चालू करण्यात आले.