पुणे येथे मित्राच्या पत्नीला धमकी देणारी महिला पोलीस निलंबित !

रक्षकच झाले भक्षक !

पुणे – मित्राच्या पत्नीला जिवे मारण्याची धमकी देणार्‍या पुणे पोलीस दलातील अनघा ढवळे या महिला पोलीस शिपायाला निलंबित करण्यात आले आहे. ढवळे कोथरूड वाहतूक विभागात नियुक्तीस होती. २ महिन्यांपूर्वी ढवळेविरुद्ध कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. या प्रकरणी ३१ वर्षीय महिलेने तक्रार दिली होती.

‘मी पुण्यातील स्थानिक आहे. माझी गुंडांसमवेत ओळख आहे. मी एक सामाजिक संस्था चालवते. सामाजिक संस्थेच्या माध्यमातून काळा पैसा चलनात आणते. आमच्या संस्थेकडून ९ कोटी रुपयांचा व्यवहार झाला. तुझ्या पतीला ४० ते ५० लाख रुपये मिळणार आहेत’, असे ढवळेने महिलेला सांगितले होते. ‘मी सांगेल तशी वागली नाही, तर तुला ठार मारू’, अशी धमकी ढवळेने महिलेला दिली होती. ढवळेविरुद्ध गुन्हा नोंद झाल्यानंतर तिची चौकशी करण्यात आली. त्यानंतर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी तिला पोलीस सेवेतून निलंबित करण्याचे आदेश दिले.