कणकवली तालुक्यात ‘मिशन वात्सल्य’ योजना प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय

कोरोनामुळे अनाथ झालेली मुले आणि विधवा महिला यांच्यासाठी शासनाची योजना

मिशन वात्सल्य योजने विषयी बैठकीत बोलतांना कणकवली तहसीलदार आर्.जे.पवार

कणकवली – कोरोनामुळे आई-वडिलांचे निधन झाल्याने अनाथ झालेली बालके, तसेच कर्त्या पुरुषाचे निधन होऊन विधवा झालेल्या महिला यांचे लवकरात लवकर शासकीय योजनांच्या माध्यमातून पुनर्वसन व्हायला हवे. त्या अनुषंगाने तहसीलदार आर्.जे. पवार यांच्या दालनात २ ऑक्टोबरला झालेल्या तालुकास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत शासनाची ‘मिशन वात्सल्य’ योजना तालुक्यात प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

या वेळी बालविकास प्रकल्प अधिकारी अमोल पाटील, पंचायत समितीचे जयदीप सावंत, न्यायालयाचे साहाय्यक अधीक्षक महेश माणगावकर, आरोग्य साहाय्यक डी.व्ही. माणगावकर, बालविकास विभागाच्या अपेक्षा दताळ आदी उपस्थित होते.

कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना एक रकमी प्रत्येकी ५ लाख रुपये अर्थसाहाय्य शासनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे, तसेच अशा बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभही देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. अनाथ मुलांचे शिक्षण शासकीय संस्थांमध्ये झाल्यास त्यांचे शैक्षणिक शुल्क शासनाने माफ केले आहे, तर अशा मुलांचे खासगी शाळांतील शैक्षणिक शुल्क देण्याची सुविधा स्वयंसेवी संस्थांद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे, अशी माहिती बालविकास प्रकल्प अधिकारी पाटील यांनी या बैठकीत दिली.