थोर स्वातंत्र्यसेनानी डॉ. टी.बी. कुन्हा यांचा विसर पडणे, राज्यकर्त्यांना लज्जास्पद ! – नितीन फळदेसाई, ‘भारत माता की जय’ संघटना

डॉ. टी.बी. कुन्हा

वास्को – गोवा मुक्तीलढ्यातील थोर स्वातंत्र्यसेनानी डॉ. टी.बी. कुन्हा यांच्या स्मृतीदिनाचा वास्को येथील राजकारण्यांना विसर पडल्याविषयी आश्चर्य वाटते. राजकारण्यांसाठी ही गोष्ट लज्जास्पद आहे, असे मत ‘भारत माता की जय’ आणि ‘गोवा सुरक्षा मंच’चे वास्को विभागाचे अध्यक्ष श्री. नितीन फळदेसाई यांनी व्यक्त केले आहे.

‘भारत माता की जय’ संघटनेच्या वतीने २६ सप्टेंबर या दिवशी डॉ. टी.बी. कुन्हा यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने त्यांना वास्को येथे त्यांच्या पुतळ्याजवळ आदरांजली वहाण्यात आली. श्री. नितीन फळदेसाई यांनी या वेळी डॉ. कुन्हा यांच्या महान कार्याची उपस्थितांना माहिती करून दिली. ते म्हणाले, ‘‘डॉ. टी.बी. कुन्हा यांच्या पुतळ्याची आणि येथील परिसराची योग्य निगा राखण्यात येत नाही आणि हा संतापजनक प्रकार आहे. मुरगाव पालिका आणि  सबंधित यंत्रणा यांच्या दुर्लक्षामुळे पुतळा अन् सभोवतालचा परिसर यांची दुरवस्था झाली आहे.’’